आघाडीतील ‘मनसे’च्या संभाव्य समावेशाचा लाभ कुणाला?

By किरण अग्रवाल | Published: February 3, 2019 01:02 AM2019-02-03T01:02:08+5:302019-02-03T01:06:51+5:30

काँग्रेस आघाडीत ‘मनसे’च्या समावेशाने नाशिक मतदारसंघात राष्टÑवादीला भलेही लाभ होऊ शकेल. परंतु मनसेच्या अपेक्षेनुसार दिंडोरीची जागा त्यांच्यासाठी सोडली गेल्यास उमेदवारीसाठी मुंडावळ्या बांधून तयार असलेल्या राष्टÑवादीतील इच्छुकांचे काय? शिवाय, हा प्रश्न केवळ लोकसभा निवडणुकीपुरता नाही तर विधानसभेच्याही दृष्टीने परिणामकारक ठरणारा आहे. लोकसभेचे निभावूनही जाईल, त्यानंतर विधानसभेसाठी किती जागांची तडजोड करणार व कुणाकुणाचे पत्ते कापले जाणार, हा खरा मुद्दा आहे.

Who has the potential inclusion of MNS in the alliance? | आघाडीतील ‘मनसे’च्या संभाव्य समावेशाचा लाभ कुणाला?

आघाडीतील ‘मनसे’च्या संभाव्य समावेशाचा लाभ कुणाला?

Next
ठळक मुद्दे स्थानिक पातळीवर बिघाडीच्या शक्यतांची चर्चा जय-पराजय हा नंतरचा भाग जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणारी

 सारांश

राजकीय तडजोडी तेव्हाच घडून येतात, जेव्हा स्वबळाची खात्री नसते. अलीकडे तर राष्ट्रीय पक्षांनाही त्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही, त्यामुळे निवडणुकांमध्ये ‘जोड-तोड’चे राजकारण अपरिहार्य ठरले आहे. राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाऊ पाहण्याच्या ‘मनसे’च्या भूमिकेकडे त्याचसंदर्भाने बघता यावे. उभयतांच्या या सामीलकीचा कुणाला लाभ अगर तोटा होईल हे नंतर कळेलच; परंतु या आघाडीअंतर्गत ‘मनसे’ने लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील एक जागा मागितल्याच्या वार्तेने स्थानिक पातळीवर बिघाडीच्या शक्यतांची चर्चा घडून येणे स्वाभाविक ठरले आहे.
केंद्रातील भाजपा सरकारला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आदी समविचारी पक्षांची महाआघाडी होऊ घातली आहे. याअंतर्गत ‘मनसे’ व ‘माकपा’-‘भाकप’ आदी पक्षांनाही सोबत घेण्याचे प्रयत्न असून, ‘मनसे’ व राष्ट्रवादीतील गुफ्तगू त्यातूनच घडून येत आहे. अर्थात, आजवर शिवसेनेच्या खांद्यावर मान ठेवून भाजपा ग्रामीण भागात वाढत आली त्याप्रमाणे शहरी तोंडवळा असलेल्या ‘मनसे’नेही राष्ट्रवादीच्या खांद्याचा आधार घ्यायचे ठरवले असेल तर ते त्यांच्यासाठी राजकीय लाभाचेच ठरू शकेल. यात जय-पराजय हा नंतरचा भाग असेल, परंतु यानिमित्ताने ‘मनसे’ला ग्रामीण भागात नवनिर्माणाची बीजे नक्की पेरता येतील. मात्र दुसऱ्या बाजूने विचार करता, राजकीयदृष्ट्या मशागत करून ठेवलेल्या ग्राउंडवर आयते ‘मनसे’ला खेळण्याची संधी देणे हे राष्ट्रवादीला कितपत मानवेल, हाच खरा प्रश्न आहे.
‘मनसे’ व ‘राष्ट्रवादी’त बोलणी सुरू असल्याच्या वार्तेत ‘मनसे’कडून ज्या तीन जागा मागितल्या गेल्याचे कळते त्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या जागेचा समावेश असल्याने तर राष्ट्रवादीच्या पचन-अपचनाची क्रिया जाणून घेणे उत्सुकतेचे ठरावे. मुळात दिंडोरी लोकसभेच्या जागेवर गेल्या वेळीही राष्ट्रवादी लढली होती. यंदाही तीच दावेदारी कायम राहण्याच्या अपेक्षेने डॉ. भारती पवार यांनी तयारी चालविली आहे. अशात कौटुंबिक काटशहच्या राजकारणातून शिवसेनेत असलेल्या माजी आमदार धनराज महाले यांना राष्ट्रवादीत आणले जाऊन त्यांचे नाव लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पुढे केले गेल्याने डॉ. पवार व त्यांच्या समर्थकांत चलबिचल होणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यातूनच अलीकडे कळवणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात डॉ. पवार यांनी ‘माकपा’चे आमदार जे. पी. गावित यांना आपल्या उमेदवारीच्या समर्थनार्थ साकडे घातल्याचे पाहावयास मिळाले. डॉ. पवार व गावित यांची ही खेळी विधानसभेच्या निवडणुकीत पवार कुटुंबातीलच अन्य इच्छुकांना अडचणीची ठरू शकते. अर्थात, तिकिटाच्या अपेक्षेनेच राष्ट्रवादीत आलेल्या व माजी खासदार तसेच आमदार राहिलेल्या पिताश्री स्व. हरिभाऊ महाले यांचा वारसा लाभलेल्या धनराज महाले यांनी प्रचारही सुरू करून दिल्याचे पाहता ‘मनसे’ची या जागेची मागणी गांभीर्याने घेतली जाण्याची चिन्हे नाहीत. शिवाय, राष्ट्रवादीतर्फे ‘मनसे’ला सोबत घेण्याचे जसे प्रयत्न आहेत तसेच माकपालाही आघाडीत सहभागी करून घेतले जाण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास ‘माकपा’देखील दिंडोरीच्या जागेवर दावा ठोकण्याची शक्यता आहे. कारण ते त्यांचे प्रभावक्षेत्र आहे. तेव्हा कुणासाठी कुणाला तडजोड करावी लागेल, हे ‘जाणत्या’ नेत्यासच ठाऊक.
महत्त्वाचे म्हणजे, ‘मनसे’ने मुंबई व ठाण्यातील एकेका जागेसह नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीची जागा मागितल्याचे वृत्त असल्याने दिंडोरीच का, नाशिक का नाही; असा प्रश्न उपस्थित होऊन गेला आहे. खरे तर नाशिक महापालिकेत ‘मनसे’ने सत्ता भूषविली असून, येथे करून दाखविल्याचा डंका राज ठाकरे राज्यभर पिटत असतात. २००९च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या ‘मनसे’च्या उमेदवाराला दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती, तर त्यापाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीत नाशकातून तीन आमदार निवडून गेले होते. त्यामुळेच तर नाशिकला ‘राजगड’ संबोधले जाऊ लागले होते. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले व ‘मनसे’त मोठी पडझड झाली हा भाग वेगळा; परंतु एकेकाळी वरचष्मा राहिलेली नाशिकची जागा सोडून दिंडोरी मागण्यात आल्याने खुद्द नाशिककर अचंबित झाले आहेत. अर्थात, तीन जागांपैकी दोन मिळण्याची शक्यता पाहता दिंडोरी राष्ट्रवादीसाठी बचावेल अशीच अटकळ बांधली जात आहे; पण तरी नाशिक टाळले गेल्याने खुद्द राज ठाकरे यांचाच आता नाशिकवर भरोसा राहिला नाही की काय, अशी शंका घेतली जाणे अप्रस्तुत ठरू नये.
मध्यंतरी राज ठाकरे यांनी पुन्हा नाशिकवर लक्ष केंद्रित करून पक्ष- संघटनेतील सुस्ती झटकली आहे. त्यांचे दौरेही वाढले असून, नवनियुक्त पदाधिकारी पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. राज ठाकरे यांनी गेल्यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात दौरे करून कांद्याप्रश्नी संतप्त असलेल्या शेतकºयांच्या भावना जाणून घेत, पुढाºयांना कांदे फेकून मारा म्हणत त्यांच्याशी जवळीक साधली. राज ठाकरे यांचे वक्तृत्व व ग्रामीण भागात असलेली उत्सुकता यामुळे त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. तेव्हा त्यांचे ‘चलो गाव की ओर’ अभियान हे नवीन मतदार जोडण्यासाठी व ‘मनसे’चा वाढ-विस्तार ग्रामीण भागात करण्यासाठी होते हे काही लपून राहिलेले नव्हते. त्यावेळी दिंडोरी, पेठ, कळवण परिसरात मिळालेला प्रतिसाद पाहता ते लोकसभेसाठी दिंडोरीच्या जागेवर लढतील असेही अपेक्षित होते, कारण नाशकात गेल्यावेळी अनामत रक्कम जप्तीची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती. परंतु राष्ट्रवादीची प्रबळ दावेदारी व तयारीही सुरू झालेली असताना त्यांनी आघाडीअंतर्गत दिंडोरीवर दावा केल्याने राष्ट्रवादीवाले हबकून गेले आहेत. बरे, लोकसभा निवडणुकीचा आवाका पाहता त्या क्षमतेचा उमेदवार असल्याने हा दावा केला गेला आहे म्हणायचे तर तसेही काही नाही. अर्थात, निवडणुकीच्या राजकारणात आधी जागा पदरात पाडून घेऊन नंतर उमेदवाराचा शोध घेतला जात असतो हेही खरे. त्यामुळे खरेच राष्ट्रवादी उदार झाली तर ‘मनसे’कडून उमेदवारी मिळवण्यासाठी अन्य इच्छुक पुढे सरसावतीलही, पण त्याने राष्ट्रवादीत घडून येऊ शकणारी नाराजी टाळता येणार नाही.
एकूणच, मनसे व राष्ट्रवादीच्या आघाडीच्या चर्चेने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापून गेले असले तरी, कुणाचा कुणाला लाभ अगर तोटा होतो हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नाशकात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ‘मनसे’च्या पाठबळाचा लाभ भलेही होऊ शकेल, परंतु दिंडोरीत ‘मनसे’ला ते राष्ट्रवादीकडून लाभेल का, हे शंकास्पदच ठरावे. आधीच स्व. ए.टी. पवार कुटुंबीयांत असलेली वर्चस्ववादाची स्पर्धा व त्यात जागा अन्य पक्षाला जाणे, यातून अन्य पक्षाला ‘अच्छे दिन’ येण्याचा मार्ग मोकळा होण्याचा धोकाही यातून टाळता येऊ नये. कारण प्रश्न केवळ लोकसभा निवडणुकीचा नाही. त्यानंतर किंवा सोबतीने होणाºया विधानसभा निवडणुकीतही आघाडीच राहिल्यास नाशिक व जिल्ह्यातील मिळून किमान २ ते ३ जागांची मनसेची अपेक्षा राहील. त्यामुळेच यासंबंधीची चर्चा जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणारी ठरली आहे.

Web Title: Who has the potential inclusion of MNS in the alliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.