शहरात पाणीकपात वर्षभर

By admin | Published: November 18, 2015 11:47 PM2015-11-18T23:47:32+5:302015-11-18T23:48:06+5:30

शनिवारी बैठक : आरक्षणात वाढीव पाणी अशक्य

Waterfall throughout the year in the city | शहरात पाणीकपात वर्षभर

शहरात पाणीकपात वर्षभर

Next

नाशिक : जायकवाडी धरणासाठी नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून १.३६ टी.एम.सी. पाणी सोडल्यानंतर शनिवारी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होत असलेल्या धरणांच्या पाणी आरक्षण बैठकीत नाशिक महापालिकेसाठी एकवेळ कपात केलेल्या पाणीपुरवठ्याच्या आधारेच पाण्याचे आरक्षण ठेवण्यात येणार असल्याने शहरात वर्षभर पिण्याच्या पाण्यात कपात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या गंगापूर धरणात ३०२३ दशलक्ष घनफूट, तर समूहात ४२३१ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक असून, या पाण्यातच नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहत, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र वसाहत, त्र्यंबकेश्वर तसेच अन्य पाणीपुरवठा योजनांसाठीही याच समूहातून पाणीपुरवठा केला जातो. शनिवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या हजेरीत जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. डिसेंबर ते आॅगस्ट अखेर अशा आठ महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्यासह उद्योग, सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवताना धरणांमधील उपलब्ध साठा व पाण्याची मागणी याचा मेळ घातला जाणार आहे.
नाशिक महानगरपालिकेने पाणी आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच गेल्या महिन्यापासून पाणीकपात लागू केली असून, ही कपात धरूनच आगामी काळासाठी २९३१ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहे. गंगापूर धरणातील सध्याचा साठा पाहता तो फक्त ३०२३ दशलक्ष घनफूट इतकाच आहे. नाशिक महापालिकेला पिण्यासाठी पाणी दिल्यानंतर गंगापूर धरणात अवघे शंभर दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक राहते. याचाच अर्थ महापालिकेने पाणीकपात न करण्याचा निर्णय घेत वाढीव पाण्याची मागणी केली तर ते
देणे आजच्या घडीला शक्य दिसत नाही.
गंगापूर धरण समूहातील पाण्याचा विचार केला तर एकूण पाण्याच्या २० टक्के पाण्याची गळती व बाष्पीभवन होणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. वर्षागणिक वाढत जाणारा उन्हाचा तडाखा पाहता, यंदाही उन्हाळा कडक असला तर बाष्पीभवनातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नाशिकच्या औद्योगिक वसाहतीसाठी, एकलहरे, कसबे-सुकेणे, त्र्यंबक नगरपालिका, पिंप्री सय्यद व थेरगावसह आठ गावांच्या पाणीपुरवठा योजनेला किती पाणी मिळेल, याविषयी साशंकता आहे.
याशिवाय गंगापूर धरण समूहातूनच सिंंचनाचेही आवर्तन असून, पहिले आवर्तन डिसेंबरमध्येच सोडावे लागते, त्यासाठी पाणी मिळेल किंवा नाही याचा फैसला शनिवारच्या बैठकीतच होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waterfall throughout the year in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.