आयुक्तांच्या समर्थनासाठी ‘मी नाशिककर’ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:16 AM2018-11-22T01:16:55+5:302018-11-22T01:17:09+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कायद्यानुसार आणि शहर हिताचे काम होत असतानाच त्यांची मुदतपूर्व बदली झाल्याने मुंढे समर्थक संतप्त झाले आहेत. दत्तक पित्याकडून नाशिककरांची फसवणूक असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत असून, याच्या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी (दि.२२) रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 To support the Commissioner, I am on Nashik Road | आयुक्तांच्या समर्थनासाठी ‘मी नाशिककर’ रस्त्यावर

आयुक्तांच्या समर्थनासाठी ‘मी नाशिककर’ रस्त्यावर

Next

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कायद्यानुसार आणि शहर हिताचे काम होत असतानाच त्यांची मुदतपूर्व बदली झाल्याने मुंढे समर्थक संतप्त झाले आहेत. दत्तक पित्याकडून नाशिककरांची फसवणूक असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत असून, याच्या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी (दि.२२) रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी अविश्वास ठराव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सर्व पक्षीय सदस्यांनी मांडला होता. त्यावेळीदेखील शहरातील विविध नागरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांसाठी वॉक विथ कमिशनर कार्यक्रम राबविला. आता आपण आयुक्तांसाठी वॉक फॉर कमिशनर म्हणून रस्त्यावर उतरू असा संदेश देत नागरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. महापालिका वर्तुळात गेल्या पंधरवड्यापासून मुंढे यांच्या बदलीची चर्चा असली तरी शहरात मात्र सोमवारपासून या चर्चेने जोर धरला. बुधवारी (दि.२२) आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होऊन त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू झाली आणि मुंढे समर्थकांचा बांध फुटला. यासंदर्भात विविध ग्रुपवर मुंढे समर्थकांनी नाराजी व्यक्त करीत आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट करीत लढ्याची दिशा ठरविली. त्यानुसार गुरुवारी (दि.२२) रस्त्यावर उतरण्यात येणार आहे. राज्य शासनाने आयुक्तांची बदली रद्द करावी यासाठी संघटना आणि पक्षभेद विसरून कार्यकर्ते आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंढे समर्थक नागरी संघटनांनी महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधिकारी भाजपा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त केला असून, भाजपाङ्मला मतदान करू नका हाच मुंढे यांच्या बदलीचा बदला ठरेल, असेदेखील सोशल मीडियावर म्हटले आहे.
बदलीच्या पत्राची प्रतीक्षा
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असल्याची चर्चा सकाळपासूनच सुरू असली तरी यासंदर्भात शासनाकडील कोणतेही पत्र आयुक्त मुंढे यांना प्राप्त झालेले नव्हते. बुधवारी (दि. २१) ईदची शासकीय सुटी असल्याने अशाप्रकारचा पत्रव्यवहार होऊ शकत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राधाकृष्ण गमे यांची नाशिकला बदली झाली असली तरी मुंढे यांची कुठेही नियुक्ती झालेली नाही त्यामुळे त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे मुंढे यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Web Title:  To support the Commissioner, I am on Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.