स्मार्ट सिटीचे झुंजुमुंजु झाले...

By किरण अग्रवाल | Published: June 24, 2018 01:16 AM2018-06-24T01:16:38+5:302018-06-24T01:23:03+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून स्मार्ट सिटी या शब्दाने नागरिकांवर गारुड केले होते. स्मार्ट सिटीत समावेशासाठी प्रबोधन कार्यक्रमात अगदी रांगोळी स्पर्धाही झाल्या, परंतु त्यानंतर स्मार्ट म्हणजे नाशिकचे नक्की काय होणार, हे कोणालाही सांगता येत नव्हते. अनेक प्रकारच्या परिश्रमानंतर नाशिकचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आणि सुरुवातीचे काही महिने नियुक्त्यांमध्येच गेले. आताही मंजुरी, निविदा आणि सर्वेक्षण यापलीकडे काहीच होत नाही, असे दिसत असताना त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभदरम्यान स्मार्ट रोड साकारण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी सुरू झालेल्या कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाची कामेही रूप धरू लागली आहेत.

 Smart City ties up ... | स्मार्ट सिटीचे झुंजुमुंजु झाले...

स्मार्ट सिटीचे झुंजुमुंजु झाले...

Next
ठळक मुद्दे केवळ हाकाटी पिटली जात होती आणि प्रत्यक्षात काही दिसत नव्हतेदोन देशांइतकीच शहरांशहरांमध्येदेखील स्पर्धा लागली आहेकंपनीच्या हालचाली बघता स्मार्ट सिटी म्हणजे काय रे भाऊ असा प्रश्न पडावा

आपण ज्या शहरात किंवा गावात राहतोय, त्याचे रूपडे बदलणे कोणाला नाही आवडणार, त्यात नाशिककर तर प्रत्येक बाबतीत सजग असल्याने स्मार्ट सिटीत या शहराचा समावेश व्हावा येथपासून ते प्रत्येक प्रकल्पाची व्यवहार्यता पडताळून त्याबाबत भूमिका ठरवण्याइतपत शहाणपण नक्कीच नागरिकांजवळ आहे. तथापि, शहर स्मार्ट होणार म्हणून गेल्या काही वर्षांपासून केवळ हाकाटी पिटली जात होती आणि प्रत्यक्षात काही दिसत नव्हते. ते चित्र आता पालटू लागले आहे. महाकवी कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाच्या नूतनीकरणापाठोपाठ शहरातील त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभदरम्यान स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना मुहूर्त लागला आहे, हे निश्चित.
गेल्या काही वर्षांपासून जागतिकीकरणाशी स्पर्धा करताना केवळ व्यापार-उद्योग नव्हे तर तेथील अर्थकारण आणि आपल्या शहरातील अर्थकारण याचीदेखील तुलना होऊ लागली. त्यामुळे दोन देशांइतकीच शहरांशहरांमध्येदेखील स्पर्धा लागली आहे. विदेशी गुंतवणूक आपल्या शहरात यायची असेल तर त्यासाठी शहर जागतिक दर्जाचे व्हायला हवे, याची जाणीव सुबुद्ध नागरिकांत वाढायला लागली. त्यातूनच मग केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना नेहरू अभियानांतर्गत ६२ शहरांची निवड झाली. नाशिकच्या नैसर्गिक महत्त्वाविषयी नेहमीच बोलले जाते. त्यामुळे या प्रकल्पात नाशिकची विनासायास निवड झाली. त्यात नाशिक महापालिकेने सादर केलेला आराखडा आणि त्यातील प्रकल्पांमधील घोटाळे हे वादग्रस्त मुद्दे घटकाभर बाजूला ठेवले तरी नाशिकमध्ये रस्ते, पाणी, गटारी अशा अनेक भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, हे नाकारून चालणार नाही. या अभियानात पावसाळी गटार, घरकुल योजना अशा अवांतर कामांबरोबरच मुकणेसारखी योजना आखली गेली जी भविष्यातही नाशिकच्या विकासाला कमी पडणार नाही.
केंद्र सरकारच्या अशा योजनांमुळे नाशिकच्या विकासाला हातभार लागला असला तरी बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात अत्याधुनिक सुविधांचा विचार करता नाशिकचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा, ही साऱ्याच नाशिककरांची अपेक्षा होती. त्यानुरूप पहिल्या टप्प्यात योजना हुकली आणि दुस-या टप्प्यात नाशिकचा समावेश झाला असला तरी गेल्या काही महिन्यांतील स्मार्ट सिटी कंपनीच्या हालचाली बघता स्मार्ट सिटी म्हणजे काय रे भाऊ असा प्रश्न पडावा, अशी स्थिती होती. समितीत सदस्य, त्यांचे अधिकार, अधिकारी, तज्ज्ञ संचालक अशाप्रकारच्या सर्व सोपस्कारानंतरदेखील जेव्हा प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली तेव्हा महाकवी कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण, रामवाडी पुलाला पर्यायी पूल उभारणे अशाप्रकारची जी पारंपरिक आणि महापालिकेची प्राय: जबाबदारी असलेलीच कामे करण्याची आखणी झाली, तेव्हा नाशिककरांचा अपेक्षा भंग होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली; परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांत स्मार्ट सिटीच्या कामांना जो वेग आला आहे आणि त्यातून प्रकल्प साकारण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली ती बघता नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या महिन्यात त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभदरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील स्मार्ट रोडच्या कामांना सुरुवात झाली आहे. जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशा महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांसमोरील हा रस्ता शहरातील महत्त्वाचा रस्ता असून, त्यालगत तीन-चार शाळादेखील आहेत. साहजिकच ऐन पावसाळ्यात हा रस्ता खोदणे, एक मार्ग बंद करणे यामुळे सा-यांचीच गैरसोय होत असली तरी ती काही काळासाठीच होणार आहे. आदर्श पदपथ, सायकल ट्रॅक, वायफाय अशा प्रकारच्या सुविधा देणारा हा मार्ग असेल असे सांगण्यात आले आहे, त्याकरिता कळ काढणे आलेच, परंतु अशी कामे करताना अगोदरच शासकीय यंत्रणा, संबंधित शाळा, वाहतूक शाखा यांच्या समन्वयाने निर्णय झाला असता तर सध्याची परिस्थिती उद्भवली नसती. शिवाय रस्ता रुंदीकरणाची त्यात तरतूद असली तरी अगोदर जागा ताब्यात घेतली आहे का किंवा मिळणार आहे काय याबाबतदेखील आढावा घेतला असेल तर अडचण होणार नाही. स्मार्ट सिटीचे पहिलेच ‘रस्त्यावरील’ काम होत असताना प्रयोग म्हणून त्याकडे बघितले तर पूर्वतयारी ही सर्वच ठिकाणी आवश्यक आहे असे म्हणावे लागेल. कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार करून ठेका देण्यात आला, मग कलावंतांची मते जाणून घेण्यात आली, त्यामुळे आराखड्यानंतर किती बदल होणार असाही प्रश्न निर्माण झाला. आता तर स्मार्ट सिटी कंपनीने या वास्तूचे खासगीकरण करण्याची तयारीही सुरू केली आहे. हा निर्णय तरी कलावंतांना विश्वासात घेऊनच व्हायला हवा.
गेल्या काही महिन्यांत शहर स्मार्ट करण्यासाठी अनेक निर्णय झाले आहेत. निविदादेखील मागवल्या जात आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कामांना गती दिल्याने आता शहरात ई-पार्किंग, सायकल शेअरिंग, चोवीस तास पाणी अशी प्रत्यक्ष लोकांच्या गरजेची कामे साकारली जाण्याची शक्यता आहे. परंतु या सर्व गोष्टी प्रथमच नाशिकमध्ये होत असताना व त्यासंदर्भातील निर्णय घेताना लोकसहभाग जो स्मार्ट सिटीचा आत्मा आहे, तो सर्वाधिक
महत्त्वाचा आहे. पूर्वनियोजनातच नागरिकांचा सहभाग असेल तर योजना राबविताना येणा-या अडचणी आणि त्यापाठोपाठ तक्रारी या सा-याच दूर होऊ शकतील. लोकसहभागाशिवाय सिटी ‘स्मार्ट’ कशी होईल?

Web Title:  Smart City ties up ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.