शेट्टींची एण्ट्री; विरोधकांकडून भाजपाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:07 AM2017-11-22T01:07:34+5:302017-11-22T01:09:27+5:30

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अधिकृत आदेशाची प्रत न मिळाल्याने अखेर न्यायालयाच्याच आदेशाने भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना दोन तासांसाठी महापालिकेच्या महासभेला हजर राहण्याची परवानगी मिळाली आणि शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात मंगळवारी (दि.२१) झालेल्या महासभेत अवतरली.

Shetty's Entry; BJP's presence from opponents | शेट्टींची एण्ट्री; विरोधकांकडून भाजपाची हजेरी

शेट्टींची एण्ट्री; विरोधकांकडून भाजपाची हजेरी

Next
ठळक मुद्दे शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात महासभेत भाजपाच्या नगरसेवकांची फौज दिमतीला महासभेतील हजेरीमुळे शेट्टींचे नगरसेवकपद जाता जाता शाबूत राहिले

नाशिक : उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अधिकृत आदेशाची प्रत न मिळाल्याने अखेर न्यायालयाच्याच आदेशाने भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना दोन तासांसाठी महापालिकेच्या महासभेला हजर राहण्याची परवानगी मिळाली आणि शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात मंगळवारी (दि.२१) झालेल्या महासभेत अवतरली. स्वाक्षरी  करण्यापासून ते सभागृहात कामकाज घेण्यापर्यंतचे सारे सोपस्कार पार पाडण्यासाठी शेट्टीच्या दिमतीला पंचवटीतीलच भाजपाच्या नगरसेवकांची फौज दिमतीला होती. अखेर, महासभेतील हजेरीमुळे शेट्टींचे नगरसेवकपद जाता जाता शाबूत राहिले. दरम्यान, विरोधकांनी महासभेबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित करत भाजपाची हजेरी घेण्याचा प्रयत्न केला परंतु, महापौरांनी त्याकडे काणाडोळा करत सभेचे कामकाज पुढे नेले.  गुन्हेगाराच्या खुनाच्या आरोपावरून कारागृहात असलेल्या भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांचे नगरसेवकपद शाबूत राहण्यासाठी मंगळवारी (दि.२१) महासभेला त्यांची उपस्थिती अनिवार्य होती. शेट्टी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यांना न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत प्रत मंगळवारी दुपारपर्यंत प्राप्त झालेली नव्हती. तत्पूर्वी, शेट्टी यांनी न्यायालयाकडेच विनंती अर्ज करून महासभेला हजर राहण्याची परवानगी मागितली होती, तर न्यायालयानेही महापौरांकडून महासभा असल्याबाबतचे पत्र मागविले होते.  त्यानुसार, न्यायालयाने शेट्टी यांना महासभेच्या कामकाजाला हजर राहण्यासाठी दुपारी १ ते ३ या दोन तासांची मुदत दिली. 
सभागृहात  शेट्टी म्हणाले, माझे प्रस्ताव मंजूर करा 
दरम्यान, महासभेत शेट्टी यांनी चार प्रस्ताव सादर केलेले होते. महासभेत राष्टÑवादीचे गजानन शेलार फाळके स्मारकातील ठेक्यासंदर्भातील प्रस्तावावर बोलत असताना शेट्टींच्या बाजूला बसलेले भाजपा नगरसेवक जगदीश पाटील यांची मात्र घालमेल होत होती. त्यांनी पीठासनावर जात शेट्टी यांना काही मिनिटांचाच अवधी उरल्याने बोलू देण्याची विनंती महापौरांकडे केली. त्यामुळे महापौरांनी शेलार यांना मध्येच थांबवत शेट्टी यांना बोलण्याची संधी दिली आणि शेट्टी यांनी एका ओळीत माझे प्रस्ताव मंजूर करा, असे सांगत पोलीस बंदोबस्तातच सभागृह सोडले. तत्पूर्वी, विरोधकांनी सोमवारी झालेली महासभा तहकूब होती काय, असा सवाल करत मंगळवारच्या सभेबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आणि भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापौरांनी सोमवारची महासभा तहकूब नसल्याचे सांगत उर्वरित कामकाज मंगळवारी घेतले असल्याचे स्पष्ट केले आणि विरोधकांना गप्प करत सभेचे कामकाज पुढे नेले.
दरम्यान, शेट्टी यांच्या हजेरीने त्यांचे नगरसेवकपद  शाबूत राहिले.

Web Title: Shetty's Entry; BJP's presence from opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.