ज्येष्ठ समाजसेविका रजनीताई लिमये यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:30 AM2018-01-17T01:30:11+5:302018-01-17T04:29:28+5:30

चार दशकांपासून मानसिक विकलांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी झपाटलेल्या, त्यांना मायेची ऊब देणाºया ज्येष्ठ समाजसेविका आणि प्रबोधिनी संस्थेच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे मंगळवारी (दि. १६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

Senior Social Worker Rajinitai Limaye passes away | ज्येष्ठ समाजसेविका रजनीताई लिमये यांचे निधन

ज्येष्ठ समाजसेविका रजनीताई लिमये यांचे निधन

Next
ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयात देहदान आणि नेत्रदान मुथा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास

नाशिक : चार दशकांपासून मानसिक विकलांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी झपाटलेल्या, त्यांना मायेची ऊब देणाºया ज्येष्ठ समाजसेविका आणि प्रबोधिनी संस्थेच्या संस्थापक रजनीताई लिमये यांचे मंगळवारी (दि. १६) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार, नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयात देहदान आणि नेत्रदान करण्यात आले. रजनीतार्इंच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक क्षेत्रातील मोठा आधारवड कोसळला आहे. दोन ते तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शहरातील मुथा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

दुपारी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंडित कॉलनीतील प्रबोधिनी विद्या मंदिर येथे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. रजनीताई या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका निशिगंधा वाड यांच्या मावशी तर ज्येष्ठ साहित्यिक विजया वाड यांच्या ज्येष्ठ भगिनी होत. नाशिकच्या सामाजिक चळवळीतील रजनीतार्इंचे योगदान संस्मरणीय आहे. प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. रजनीनाई उच्चशिक्षित होत्या. तत्कालीन ११ वी बोर्डात त्या ठाणे जिल्ह्णात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये एमएबीएडचे शिक्षण घेतले.

२५ वर्ष त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून अध्यापन केले. १९८९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन प्रबोधिनीच्या कामाला वाहून घेतले. त्यांचा मुलगा गौतम विशेष मुलांपैकी एक असून त्याच्या शिक्षणासाठी आलेल्या अडचणींमुळे त्यांनी १ जानेवारी १९७७ साली कुसुमताई ओक आणि डॉ. शिरीष सुळे यांच्या मदतीने सर्कल सिनेमा आवारात विशेष मुलांसाठीची पहिली शाळा ‘प्रबोधिनी विद्या मंदिर’ नावाने सुरू केली. विशेष मुलांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ‘जागर’, ‘ध्यानीमनी’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. गोडुली गाणी (बालकांची गाणी) हा त्यांचा बालगीतांचा संग्रहदेखील आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. त्यांच्या कार्याची शासनाने दखल घेत १९८७ मध्ये तत्कालीन राष्टÑपती आर व्यंकटरामन यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने तर १९८८ मध्ये राज्य शासनाच्या वतीने दलित मित्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

याशिवाय नाशिक महापालिकेने लोककल्याण (१९९९) आणि संस्कृती वैभव संस्थेच्या वतीनेही (२००७) त्यांना गौरविले होते. त्यांनी लिहिलेले विशेष लेख राज्य पातळीवर गाजले आहेत. १९९४ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या आंतरराष्टÑीय सहाव्या परिसंवादात त्यांनी ‘कौटुंबिक सहानुभूतीची आवश्यकता’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची राज्य आणि राष्टÑीय पातळीवर विविध पदांवर नियुक्तीही झाली होती. त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Senior Social Worker Rajinitai Limaye passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक