‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ पुन्हा वाचकांच्या भेटीला

By admin | Published: April 14, 2017 01:19 AM2017-04-14T01:19:12+5:302017-04-14T01:21:47+5:30

आंबेडकरांचे साहित्य : जनतेची मागणी पाहता पुस्तकांची उपलब्धता

Readers' meeting again 'eradication of caste system' | ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ पुन्हा वाचकांच्या भेटीला

‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ पुन्हा वाचकांच्या भेटीला

Next

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ हे गाजलेले पुस्तक शासनाने यंदाही प्रकाशित केले असून, शासनाच्या पाचही डेपोंमध्ये हे पुस्तक उपलब्ध झाले आहे. दोन वर्षांपूर्वी सदर पुस्तकांच्या सुमारे ४० हजार प्रती शासनाच्या गुदामात पडून असल्याची बाब समोर आल्याने या पुस्तकाची मागणी अधिकच वाढली होती. ही मागणी लक्षात घेता शासनाने यंदा या पुस्तकाची आगाऊ छपाई करून जयंतीचे औचित्य साधत पुस्तकांची उपलब्धता करून दिली आहे.
समाज आणि जातिव्यवस्थेबाबत परखड चिकित्सा करणारे विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या पुस्तकात मांडल्याने पूर्वी या पुस्तकावरून बरेच वादळ उठले होते. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या पुस्तकाच्या मराठी अनुवादाची वाचकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचे हक्क राज्य शासनाकडे असल्याने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येऊन वितरित करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत होती.
दोन वर्षांपूर्वी या पुस्तकाचा वाद राज्यात चांगलाच गाजला होता. शासनाने या पुस्तकाला बंदिस्त केल्याची टीका झाल्यानंतर मागीलवर्षी शासनाने या पुस्तकांची छपाई करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिले होते. परंतु या प्रती कमी पडल्याने मागीलवर्षापासून या पुस्तकाची सातत्याने मागणी वाढत होती.
दरम्यान, शासनाकडून डॉ. आंबेडकरांच्या इतर लेखन साहित्यांचे सुमारे ३० खंड प्रकाशित करण्यात येणार असून, २१ खंडांचे प्रकाशन यापूर्वीच झालेले आहे. उर्वरित साहित्याची जुळवाजुळव आणि संशोधनाचे काम पूूर्णत्वास येत आहे. यंदाही आंबेडकरांच्या साहित्याच्या १८व्या खंडाला चांगली मागणी आहे. डॉ. आंबेडकरांच्या गाजलेल्या भाषणांचा संच यामध्ये देण्यात आलेला आहे. १८ व्या खंडाचे अ, ब, क असे एकूण तीन भाग असून, वाचकांनी १८ व्या खंडाचीदेखील मागणी नोंदविली आहे.
डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातील अंकांचा संच असलेले पुस्तकही यंदा वाचले जात आहे. शासनाच्या नागपूर, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आणि पुणे येथील केंद्रांवर या पुस्तकांची विक्री सुरू असून, नागपूर आणि मुंबईला सर्वाधिक पुस्तक विक्री होत आहे.
येत्या १० तारखेपर्यंत बाबासाहेबांच्या निवडक पुस्तकांवर शासनाने सवलत दिलेली आहे. शासनाच्या डेपोत मिळणाऱ्या पुस्कांबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या वतीने सामाजिक न्यायाची पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, त्यांचे विनामूल्य वितरण केले जात आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रंथालये, वाचनालये, शिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्था यांना काही ग्रंथांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Readers' meeting again 'eradication of caste system'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.