त्र्यंबकेश्वर : येथे कार्तिक शु. १५ अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे त्र्यंबकेश्वराची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो भाविक सहभागी झाले होते.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहराचे भूषण समजला जाणारा २२ फूट उंचीचा रथ व त्यावर महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाचा पंचमुखी मुखवटा तसेच मूर्तीवर रत्नजडीत मुकुट ठेवून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथोत्सवास सुरुवात करण्यापूर्वी भगवान त्र्यंबकराजाची रत्नजडीत मुकुटासह सवाद्य मिरवणूक कुशावर्त तीर्थावर नेण्यात आली. तेथे त्र्यंबकराजाला स्नान घालत पूजा आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक अधिकच रंगली. यावेळी आकर्षक फुले व रोषणाईत रथ अधिक शोभून दिसत होता. रथाच्या अग्रभागी भगवान ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवलेली होती.
मिरवणुकीदरम्यान आकर्षक आतषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी सुवासिनींनी रथाचे स्वागत व औक्षण केले. संपूर्ण रस्त्याची स्वच्छता सडासंमार्जन करून आकर्षक अशा रांगोळ्या, फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या. त्यावरून भगवान त्र्यंबकराजाची मिरवणूक नेण्यात आली. रात्री ८ वाजता दीपमाळ पेटविण्यात आली. तत्पूर्वी दीपमाळेची पूजा पेशव्यांचे उपाध्ये दिलीप कृष्णाजी रुईकर यांनी केली. त्यानंतर मंदिर प्रांगणात आतषबाजी करण्यात आली. सेवाभावी मंडळाकडून मिरवणूक परत आल्यावर पेढे वाटण्यात आले.
संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यातच मंदिरापुढील दीपमाळ पेटविल्याने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाले होते. तत्पूर्वी दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैकुंठ चतुर्दशीनिमित्त ज्यांनी देवस्थानला रथ अर्पण केला त्या सरदार विंचूरकरांच्या वतीने महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर प्रांगणात पालखी सोहळा व हरिहर भेटीची पूजा संपन्न झाली. रथाची पूजा करण्यात आली. रथ मिरवणुकीत संपूर्ण गावातील नागरिक, नगराध्यक्ष तृप्ती धारणे, नगरसेवक तसेच विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.