रहाटपाळण्यावरून राडा लिलावादरम्यान धक्काबुक्की : दोहोंच्या वादात महापालिकेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 20:04 IST2017-09-15T20:04:52+5:302017-09-15T20:04:58+5:30

रहाटपाळण्यावरून राडा लिलावादरम्यान धक्काबुक्की : दोहोंच्या वादात महापालिकेचा लाभ
नाशिक : नवरात्रीत कालिका यात्रोत्सवात हॉटेल संदीप समोरील मनपाच्या मोकळ्या जागेत रहाटपाळण्याचा ठेका देण्यासाठी राजीव गांधी भवनमध्ये झालेल्या लिलावादरम्यान ठेकेदारांमध्ये राडा झाला. लिलावाच्या बोलीत सहभागी होणाºया ठेकेदाराला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. लिलावात बोली बोलण्याच्या वादात महापालिकेला मात्र मागील वर्षाच्या तुलनेत पाचपट जास्त महसूल प्राप्त झाला.
नवरात्रीत कालिका यात्रोत्सवात दरवर्षी महापालिकेमार्फत हॉटेल संदीप समोरील मोकळ्या जागेत रहाटपाळण्यांसह आदी मनोरंजनपर खेळ उभारण्यासाठी ठेका दिला जात असतो. शुक्रवारी (दि. १५) महापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये सकाळी लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. महापालिकेने ३ लाख ९० हजार रुपयांपासून सुरुवात केली. या लिलावप्रक्रियेत १८ ठेकेदार सहभागी झाले होते. त्यात ठेकेदार दीपक डोके यांनी बोलीप्रक्रियेत दरवेळी शंभर रुपयांनी वाढ करण्यास सुरुवात केली. प्रतिस्पर्धी ठेकेदाराने सदर लिलाव प्रतिष्ठेचा करत बोली दहा लाखांपर्यंत जाऊन पोहोचली. दरम्यान, डोके यांच्याच विनंतीवरून दहा मिनिटांचा ब्रेक घेण्यात आला आणि या ब्रेकमध्येच राडा झाला. दीपक डोके यांना बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली; मात्र बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. यावेळी, काही कार्यकर्त्यांकडे शस्त्रेही असल्याचे सांगितले जाते. धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा लिलावप्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी मुंबई नाका मित्रमंडळाचे संदीप विधाते यांनी सदर ठेका १३ लाख ५ हजार ५०० रुपयांना घेतला. त्यावर २ लाख ३४ हजार ८९० रुपये जीएसटी लागून सदर ठेका हा १५ लाख ४० हजार ४९० रुपयांना गेला. मागील वर्षी हाच ठेका ३ लाख ५७ हजार रुपयांना गेला होता; परंतु यंदा ठेकेदारांच्या वादात महापालिकेची चांदी झाली आणि रहाटपाळण्याने मनपाच्या खजिन्यात पाचपट रक्कम जास्त पडली.