प्रतापदादा सोनवणे यांची भाजपाकडून उपेक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:53 AM2018-04-26T00:53:23+5:302018-04-26T00:53:23+5:30

 Pratapdada Sonawane retained the neglect of the BJP | प्रतापदादा सोनवणे यांची भाजपाकडून उपेक्षा कायम

प्रतापदादा सोनवणे यांची भाजपाकडून उपेक्षा कायम

googlenewsNext

नाशिक : भाजपाचे दोन वेळा विधान परिषदेचे आमदार व एक वेळा खासदार राहिलेल्या प्रतापदादा सोनवणे यांची भाजपाकडून उपेक्षा कायम आहे. शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या सोनवणे यांना डावलून भाजपाने अलीकडेच प्रवेश केलेल्या अनिकेत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून, पुन्हा एकदा सोनवणे यांचा अपेक्षाभंग करण्यात आला आहे. प्रतापदादा सोनवणे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते. मराठा समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले गेले. सोनवणे यांनीही त्याला पुरेपूर न्याय दिला. भाजपाची वर्षानुवर्षे मक्तेदारी असलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातून ना. स. फरांदे यांच्या निवृत्तीनंतर त्यांना पक्षाने संधी दिली आणि दोनवेळा ते निर्वाचित झाले. या दरम्यान, लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांना नाशिकच्या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, तेथेही ते निवडून आले. परंतु त्यानंतर मात्र पक्षाने त्यांना बाजूला ठेवण्याचे धोरण घेतले. धुळे मतदारसंघातच नव्हे, तर एकूणच देशात भाजपाला अनुकूल वातावरण असताना सोनवणे यांना उमेदवारी न देता सुभाष भामरे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर सोनवणे यांनी तापी खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची मागणी केली होती; परंतु तेथेही संधी देण्यात आली नाही.  विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय हालचाली सुरू असून, त्या अनुषंगाने प्रतापदादा सोनवणे यांनी दावेदारी केली होती. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी बहुतांशी शिक्षक हेच मतदार असल्याने त्याचा लाभ होईल अशी त्यांची खात्री होती. परंतु तेथेही कॉँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव असलेल्या अनिकेत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपात प्रवेश केला होता हे विशेष होय.

Web Title:  Pratapdada Sonawane retained the neglect of the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा