मित्रपक्षातील फूट कॉँग्रेसच्या पथ्यावर ?

By admin | Published: August 4, 2015 11:25 PM2015-08-04T23:25:55+5:302015-08-04T23:28:08+5:30

मालेगाव : स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

On the path of a friendly faction Congress? | मित्रपक्षातील फूट कॉँग्रेसच्या पथ्यावर ?

मित्रपक्षातील फूट कॉँग्रेसच्या पथ्यावर ?

Next

मालेगाव : येथील महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपद निवडणुकीच्या निमित्ताने मनपातील सत्तारूढ तिसरा महाज व त्यांचा मित्रपक्ष यांच्यात फूट पडली आहे. एवढेच नव्हे तर तिसरा महाजलाही भगदाड पडले आहे.
तिसरा महाजनेही विरोधी कॉँग्रेसचा मित्र असलेल्या मालेगाव विकास आघाडीला आपल्या गळाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. सदर निवडणुकीसाठी अर्थपूर्ण घडामोडींनी वेग घेतल्याने कोणाची बोली किती लागते यावर ही निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी हे निश्चित होणार आहे.
या निवडणुकीत सर्वप्रथम कॉँग्रेसनेच आघाडी घेतली. मनपातील सत्तारूढ तिसरा महाज - शहर विकास आघाडी व शिवसेना या मित्रपक्षातील नाराजीचा कॉँग्रेसने पुरेपूर फायदा घेतला आहे. महाज व प्रामुख्याने महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांच्या कारभारावर नाराज असलेले उपमहापौर युनूस शेख ईसा यांना कॉँग्रेसने आपल्या गळास लावले. तसेच तिसरा महाजमध्येच सभापतिपदावरून चढाओढ सुरू होती. महाजचे संस्थापक माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांच्यासोबत पक्षाच्या स्थापनेपासून सावलीसारखे असणारे एजाज उमर हेही महाजमधून फुटून कॉँग्रेसच्या गोटात सामील झाले आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी आपण दावेदार असताना आपणास डावलण्यात आले. कठीण प्रसंगी पक्षाशी व माजी आमदाराशी एकनिष्ट असतानादेखील आपल्या पक्षनिष्ठेचे फळ आपणास न मिळता बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात असल्याची उमर यांची नाराजी आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे संख्याबळ आजच आठ झाले आहे.
गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने जनता दलाचे केवळ चार नगरसेवक असताना बुलंद एक्बाल यांना विनाशर्त पाठिंबा दर्शविला होता. त्या उपकाराची परतफेड म्हणून जनता दलाने स्थायीत आपणास मदत करावी, अशी कॉँग्रेसची अपेक्षा आहे. मात्र सध्या जनता दलाची भूमिका काठावरची आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेससोबत असणारी मालेगाव विकास आघाडी या निवडणुकीत
मात्र विरोधी असलेल्या महाजच्या गोटात सामील झाली आहे. ही महाजसाठी त्यातल्या त्यात समाधानकारक घटना आहे. या सर्वांमध्ये आता शिवसेनेची भूमिका ही निर्णायकी ठरणार आहे. महापौर निवडणुकीत शिवसेनेची तुलनेने ‘स्वस्तातील’ भूमिका ही सर्वात आधी उघड झाली होती. यंदा मात्र शिवसेनेने चतुराई दाखवत आपले पत्ते अजून खुले केलेले नाही. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होते, चिठ्ठी पद्धतीने होते की एकतर्फी होते हे बऱ्याचअंशी शिवसेनेच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. शेवटी स्थायीची निवडणूक ही पक्ष - विचारसरणीपेक्षा ‘विकासाची’ बोली कोण किती लावतो यावरच ठरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the path of a friendly faction Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.