Order for damages | ओखी वादळाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

ठळक मुद्देवरातीमागून घोडे : शेतक-यांसमक्ष होणार कार्यवाहीमंगळवारी सकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन दिवसभर अवकाळी पावसाने झोडपून काढले

नाशिक : दोन दिवसांपुर्वी ओखी चक्री वादळामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने केलेल्या शेती पिकाच्या हानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले असून, शुक्रवारपासून कृषी व महसूल खात्याच्यावतीने पंचनाम्यांना सुरूवात करण्यात येणार आहे. तथापि, पाऊस थांबून दोन दिवस उलटून गेल्यावर शेतकºयांनी आपल्यापरिने पिकांची सारवा सारव व उपाययोजना केल्याने पंचनाम्यात नुकसानीचा अंदाज येईल काय असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.
ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रात शिरकाव केल्यामुळे त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही उमटले. सोमवारपासून जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल झाला व मंगळवारी सकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन दिवसभर अवकाळी पावसाने झोडपून काढले त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विशेषत: काढणीवर आलेल्या द्राक्षबागा धोक्यात आल्या. काही ठिकाणी झाडावरून द्राक्षांचे घड गळून पडले तर द्राक्ष मण्यांना तडे पडण्याचेही प्रकार घडले. शेतक-यांनी खळ्यावर काढून ठेवलेला मका, कांदा, सोयाबीनचे पीक भिजले. अवघ्या बारा तासात जिल्ह्यात सुमारे १७५ मिली मीटर पावसाची नोंद यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कानाकोप-यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वाधिक नुकसान झाले. परंतु शासनाने पीक पंचनामे करण्याच्या सुचना न दिल्याने प्रशासन हातावर हात ठेवून बसली. अवकाळी पावसाने धास्तावलेल्या शेतकºयांनी पिकाचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना तसेच सारवासारव करून टाकली. आॅक्टोंबर महिन्यात अशाच प्रकारे अवकाळी पावसाने शेतकºयांची दाणाफाण उडवून प्रचंड नुकसान केले असून, त्याची अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतक-यांनी बुधवार व गुरूवार असे दोन्ही दिवस स्वत:ला पिकाच्या संरक्षणात गुंतवून घेतले. दरम्यान, ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले असून, गुरूवारी ते जिल्हाधिका-यांना प्राप्त झाले. ज्या पिकांचे आॅक्टोंबरच्या अवकाळी पावसात नुकसान झाले होते, त्यांचे फेर पंचनामे करण्याची गरज नसल्याचे शासनाने या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून कृषी व महसूूल खात्याकडून पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत.


Web Title: Order for damages
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.