नवीन व्यापारी उतरवत लासलगावी कांद्याचे लिलाव, अन्य ठिकाणी कामकाज ठप्पच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:55 PM2024-04-12T16:55:57+5:302024-04-12T16:56:48+5:30

जिल्ह्यात अन्य बाजार समित्यांत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला असताना खासगी खरेदी केंद्रांवर कांद्याचे लिलाव केले जात आहे. त्याला हमाल-मापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

Onion auction at Lasalgavi while bringing in new traders, operations at other places have stopped | नवीन व्यापारी उतरवत लासलगावी कांद्याचे लिलाव, अन्य ठिकाणी कामकाज ठप्पच

नवीन व्यापारी उतरवत लासलगावी कांद्याचे लिलाव, अन्य ठिकाणी कामकाज ठप्पच

लासलगाव (शेखर देसाई) : हमाल-मापारी यांच्या लेव्ही प्रश्नावरून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कामकाज ठप्प झालेले असतानाच शुक्रवारी (दि.१२) लासलगाव बाजार समितीत संचालक मंडळाने नवीन व्यापाऱ्यांना उतरवत कांद्याचे लिलाव सुरू केले. लासलगावी कांद्याला कमाल २९०० रुपये, तर सरासरी १५५० रुपये भाव मिळाला. दरम्यान, जिल्ह्यात अन्य बाजार समित्यांत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला असताना खासगी खरेदी केंद्रांवर कांद्याचे लिलाव केले जात आहे. त्याला हमाल-मापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

हमाल-मापारींच्या लेव्ही प्रश्नावरून गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रिया ठप्प झालेली आहे. त्यामुळे बाजार समित्यांचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. तीन दिवसांपेक्षा जास्त काळ बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवता येत नसल्याने लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी विंचूरसह लासलगाव येथील नवीन व्यापाऱ्यांना संधी देत त्यांना लिलावप्रक्रियेत सहभागी करून घेतले. दहा दिवसांनंतर लासलगावचे कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर आपला माल आणला. लासलगाव समितीतील परवानाधारक व्यापाऱ्यांनी मात्र आपले बहिष्कार अस्त्र कायम ठेवले. लासलगाव बाजार समितीने लिलाव सुरू केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. एकीकडे लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू झाले असताना येवला, पिंपळगाव बसवंत, उमराणे, देवळा येथील बाजार समित्यांतील लिलाव बंद होते. मात्र, खासगी केंद्रांवर लिलावप्रक्रिया सुरू करण्यात आली. पिंपळगाव बसवंत येथे हमाल-मापाऱ्यांनी या लिलावाला विरोध दर्शविला आहे, तर उमराणे येथे व्यापारी असोसिएशनसोबत बाजार समिती प्रशासनाने केलेली चर्चा निष्फळ ठरली. लेव्हीचा निर्णय लागत नाही तोपर्यंत खासगी जागेतच लिलाव सुरू ठेवण्याच्या निर्णयावर कांदा खरेदीदार व्यापारी ठाम राहिले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही खासगी जागेवरच कांदा लिलावाची प्रक्रिया पार पडली. या साऱ्या घटना घडामोडीत माथाडी कामगारांचा रोजगार बुडत आहे.

Web Title: Onion auction at Lasalgavi while bringing in new traders, operations at other places have stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक