अहिंसा वर्ष म्हणून साजरे करणार :  ज्ञानमती माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:21 AM2018-10-24T01:21:21+5:302018-10-24T01:22:40+5:30

सटाणा : संपूर्ण जगात शांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी आणि विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी हे वर्ष अहिंसा वर्ष  म्हणून साजरे ...

 Non-violence will be celebrated as year: Gyanmati Mata | अहिंसा वर्ष म्हणून साजरे करणार :  ज्ञानमती माता

अहिंसा वर्ष म्हणून साजरे करणार :  ज्ञानमती माता

Next

सटाणा : संपूर्ण जगात शांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी आणि विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी हे वर्ष अहिंसा वर्ष  म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माता यांनी केली. मांगीतुंगी, हस्तिनापूर आदी  ठिकाणी शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांमध्ये विश्वशांतीसाठी विविध कार्यक्र मांद्वारे अहिंसेचा नारा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  बागलाण तालुक्यातील ऋषभदेवपुरम (मांगीतुंगी) येथे सोमवारपासून तीन दिवसांच्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २३) दुसऱ्या दिवशी सायंकाळी गणिनीप्रमुख ज्ञानमती यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. आर्यिका चंदनामती माता, पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी उपस्थित महिलांनी अहिंसेवर आपापली मते मांडून संवाद साधला. प्रत्येक कुटुंबाने शिक्षणावर भर देऊन सुसंस्कृत पिढी घडविल्यास नक्कीच आपला देश अहिंसेकडे वाटचाल करेल, अशा विश्वास ज्ञानमती माता यांनी व्यक्त केला. अहिंसेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी येत्या वर्षभर  शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांमध्ये पूजापाठ, जप, अनुष्ठान, हवन आदी कार्यक्रम घेण्यात  येणार आहे, जेणेकरून संपूर्ण  जगात विश्वशांती प्रस्थापित होईल, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.
महिला मंडळाच्या राष्ट्रीय महामंत्री मनोरमा जैन (दिल्ली), प्रगती जैन (इंदूर), सुवर्णलता पाटणी (नाशिक), उषा पाटणी (लखनऊ), तृष्णा जैन यांनीही आपले विचार मांडले. यावेळी राष्ट्रीय जैन महिला मंडळाच्या वतीने श्री ज्ञानमती माता यांचा श्रीफळ ,वस्त्र भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच इंदूर येथील महिला संघटनेच्या कार्याचा चंदनामती मातांनी गौरव केला. संमेलनास महामंत्री विजय जैन, जीवनप्रकाश जैन, अनिल जैन, अनुपमा मुळे, मीनाक्षी जैन, आचल जैन, अर्चना जैन, पद्मावती जैन, राणी पहाडे, मालती जैन, कुमकुम जैन, भारती कासलीवाल, कुसुम जैन, सुमन जैन, रचना पांडे यांच्यासह कानपूर, दिल्ली, मुंबई, लखनऊ, इंदूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, जळगाव, धुळे येथील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
विश्वशांतीसाठी शाकाहाराचा प्रचार 
आर्यिका चंदनामती माता यांनी विश्वशांतीसाठी शाकाहाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. आहारावरही माणसाची प्रवृत्ती अवलंबून असते. शाकाहारामुळे भारतीय संस्कृती टिकून आहे. मांसाहार सेवन केल्यास माणसाची प्रवृत्ती हिंसक होऊन समाजात अशांतता निर्माण होते. त्यामुळे कुटुंबातील महिलांनी आपल्या घरातूनच शाकाहारावर भर दिल्यास खºया अर्थाने विश्वशांतीचा संदेश जाईल, असे आवाहन त्यांनी केले. बेटी बचाव आणि प्लॅस्टिक निर्मूलनासाठी महिलांनी पुढे यावे यासाठी विश्वशांती अहिंसा संमेलनातून प्रचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्ग वाचवण्यासाठी आणि पशू-पक्षी संवर्धनासाठी प्लॅस्टिकबंदी महत्त्वाची आहे. सामाजिक समतोल राखण्यासाठी बेटी बचावही तेवढेच महत्त्वाचे मानून महिलांबरोबरच पुरु षांनी पुढे यावे, असे आवाहन चंदनामती माताजी यांनी केले.
रासायनिक सौंदर्यप्रसाधने त्यागण्याची शपथ
महिला संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित महिलांनी विश्वशांतीच्या प्रचाराचे एक पाऊल म्हणून लिपस्टिक, रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा त्याग करण्याची सामुदायिक शपथ घेतली. या रासायनिक सौंदर्यप्रसाधनांमुळे अहिंसेला धोका असल्याचे सांगत त्यांनी ही शपथ घेतल्याचे जाहीर केले. तसेच फास्टफूडचादेखील त्याग करण्याची भूमिका घेत प्रत्येक महिलेने फास्टफूडचा त्याग करून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला स्वत: तयार केलेले शाकाहारी भोजन देण्याचा आग्रह त्यांनी केला.

 

Web Title:  Non-violence will be celebrated as year: Gyanmati Mata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.