मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 02:12 PM2024-03-13T14:12:20+5:302024-03-13T14:13:17+5:30

भाजपची कोंडी करणार : ‘ओबीसी’तून आरक्षण देण्यात सरकारला अपयश

Maratha Samaj will field 450 independent candidates from Nashik for loksabha election | मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार

मराठा समाज नाशिकमधून उभे करणार ४५० अपक्ष उमेदवार

सुयोग जोशी

नाशिक : राज्य शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न नीट हाताळला नाही. समाजाची फसवणूक केली. आरक्षणाबाबत अन्याय केला. याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आता लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात मराठा समाजाचे ४५० हून अधिक अपक्ष उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे आंदोलक नाना बच्छाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. भाजपची निवडणुकीत कोंडी करणार असल्याचेही बच्छाव म्हणाले.

बहुतांशी मराठा मतदार मराठा उमेदवारांना मतदान करणार, असा ठाम विश्वास सकल मराठा समाजाने व्यक्त केला आहे; तसेच मराठ्यांच्या जीवावर राजकीय खुर्च्या मिळवून त्यांचे ओबीसीतील आरक्षण मिळवून देण्यासाठी गप्प बसलेले आमदार, खासदार यांना मराठा समाज आता दारातही उभे करणार नाही, त्याचे नियोजन आम्ही समाजात करतो आहे. याबद्दल अर्ज भरण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. मराठा समाजाचे उमेदवार निवडणूक रिंगणात येणार म्हणून नाशिकची लोकसभा निवडणूकदेखील रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

बैठकीत घेणार निर्णय
नाशिक शहरातील ५० वैद्यकीय व्यावसायिक येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील. मराठवाड्यातून नाशिकमध्ये स्थायिक झालेले २०० हून अधिक नागरिकदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक होणार आहे. यावेळीही विविध कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे. किमान ४५० जण उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा अंदाज बच्छाव यांनी व्यक्त केला.

सरकारने मनोज जरांगे-पाटील यांची ‘एसआयटी’ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सत्तेत बसणाऱ्या मराठा आमदार, खासदारांचे अपयश आहे, मराठयांची मते लाटून समाजाला फसवणाऱ्यांना मराठा समाज कधीही उभे करणार नाही, त्यासाठीच हे नियोजन आहे. मराठ्यांना मुंबईत दिलेले आश्वासन विसरणाऱ्या, तसेच समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारला त्यांची जागा समाज दाखवेल.
- करण गायकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
इन्फो

मुंबई आंदोलनात सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना वाशी येथे दिले होते. त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सातत्याने विविध आश्वासने देऊन देखील सरकारतर्फे प्रत्यक्षात काहीही कृती करण्यात आलेली नाही. त्याचे पडसाद येत्या निवडणुकीमध्ये दिसतील.
- नाना बच्छाव, मराठा समाजाचे आंदोलक

Web Title: Maratha Samaj will field 450 independent candidates from Nashik for loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.