जॉगिंग ट्रॅकवर पेव्हरब्लॉक बसविण्याबाबत मुंढेंचा ‘यु टर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:37 PM2018-05-05T14:37:18+5:302018-05-05T14:37:18+5:30

वॉक वीथ कमिशनर : उद्यानांसमोर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ करण्याची आयुक्तांची घोषणा

To make a payback block on the jogging track, 'Yu Turn' | जॉगिंग ट्रॅकवर पेव्हरब्लॉक बसविण्याबाबत मुंढेंचा ‘यु टर्न’

जॉगिंग ट्रॅकवर पेव्हरब्लॉक बसविण्याबाबत मुंढेंचा ‘यु टर्न’

Next
ठळक मुद्देमहापालिकेची उद्याने आणि मोकळे भूखंड यावर ग्रीन जीम बसविल्या जाणार नसल्याच्या निर्णयावर मात्र मुंढे ठाम उपक्रमात एकूण ३८ नागरिकांनी आपल्या तक्रारी व सूचना मांडल्या.

नाशिक - आठवडाभरापूर्वीच जॉगिंग ट्रॅकवर पेव्हरब्लॉक बसविण्याबाबत आग्रही भूमिका घेणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.५) कृषिनगर येथील जॉगिंग ट्रॅकवर झालेल्या ‘वॉक वीथ कमिशनर’ उपक्रमात बोलताना शास्त्रीयदृष्टया तपासणी करुन पूर्ण विचारांतीच पेव्हरब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत नरमाईची भूमिका घेतली. महापालिकेची उद्याने आणि मोकळे भूखंड यावर ग्रीन जीम बसविल्या जाणार नसल्याच्या निर्णयावर मात्र मुंढे ठाम राहिले. या उपक्रमात एकूण ३८ नागरिकांनी आपल्या तक्रारी व सूचना मांडल्या.
तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक वीथ कमिशनर’ उपक्रमात रस्ते, पाणीपुरवठा यापासून ते कृत्रिमरित्या फळे पिकविली जात असल्यापर्यंतच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. मागील शनिवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या पहिल्या उपक्रमात मुंढे यांनी जॉगिंग ट्रॅकवर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. मुंढे यांच्या या निर्णयाला नागरिकांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवर झालेल्या उपक्रमात एका नागरिकाने पेव्हरब्लॉकचे समर्थन केले असता, उपस्थित नागरिकांनी मात्र त्यास तिव्र विरोध दर्शविला. विरोधाचा सूर पाहून मुंढे यांनी नरमाईची भूमिका घेत कुणा एकाच्या मतानुसार पेव्हरब्लॉक बसविले जाणार नसून शास्त्रीय पातळीवर तपासणी करुन पूर्ण अभ्यासांतीच निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. कृषीनगर येथीलच जॉगिंग ट्रॅकवर बसविण्यात आलेल्या ग्रीन जीम दुरुस्ती करण्याची मागणी एका नागरिकाने केली असता, मुंढे यांनी सदर जीमची दुरुस्ती अथवा त्या काढून टाकण्याचा निर्णय दिला. उद्याने आणि मोकळे भूखंड हे ग्रीन जीमसाठी नसून उद्याने ही उद्यानेच राहिली पाहिजेत, असे सांगत ग्रीन जीमवर त्यांनी फुली मारली. कृषिनगर जॉगिंग ट्रॅकसमोर ‘पुढे गतिरोधक आहे’ असा फलक आहे परंतु, गतिरोधक नसल्याने तो बसविण्याची मागणी एकाने केली. मात्र, गतिरोधक हे रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीच्या परवानगीनेच बसविले जात असल्याने गतिरोधक बसविण्याऐवजी फलक काढून टाकण्याची सूचना मुंढे यांनी आपल्या अधिकाऱ्याला केली. माजी नगरसेवक माणिक सोनवणे यांनी राजीवनगर येथील भाजीमार्केटला विरोध दर्शविला असता, मुंढे यांनी हॉकर्स झोनच्या ठिकाणी भाजीमार्केट असेल तर ते हटविले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. रस्त्यांवर वाहने उभे राहत असल्याची तक्रार एकाने केल्यानंतर शहरातील सर्व उद्यानांसमोर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ करण्यात येणार असल्याची घोषणा मुंढे यांनी यावेळी केली. कृषिनगर येथील जॉगिंग ट्रॅकवर पोलिस अकादमीचे ड्रेनेजचे पाणी येऊन डासांचा उपद्रव वाढल्याची तक्रार निरामय साधना या संस्थेने केली असता, मुंढे यांनी याबाबत पोलीस अकादमीला नोटीस देण्याचे आदेश अधिका-यांना दिले.
तुम्ही फक्त बोलतात, होत काहीच नाही!
कृषिनगर जॉगिंग ट्रॅकचे व्यवस्थापन सांभाळणाºया निरामय साधना या संस्थेचे अध्यक्ष जे. पी. जाधव यांनी जॉगिंग ट्रॅकबाबतच्या काही समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावेळी, मुंढे यांनी पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारू नका, असे सांगितल्याने जाधव आणि मुंढे यांच्यात थोडी बोलाचालीही झाली. त्यातच मुंढे यांनी प्रत्येक प्रश्नात नकारघंटा व उपदेशाचे डोस पाजण्यास सुरुवात केल्याने जाधव यांचा संयम सुटला आणि त्यांनी ‘तुम्ही फक्त बोलतात, होत काहीच नाही’ असे म्हटले. याशिवाय, हेच प्रश्न घेऊन पुन्हा पुढच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात घेऊन यावे लागतील, असे बोलल्यान मुंढे संतप्त झाले. अखेर जाधव यांनीच नियंत्रण ठेवत संयम राखला.

Web Title: To make a payback block on the jogging track, 'Yu Turn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.