माधवराव गायकवाड : संघर्षशील कॉम्रेड

By किरण अग्रवाल | Published: November 14, 2018 02:05 PM2018-11-14T14:05:22+5:302018-11-14T14:06:45+5:30

संघर्ष हाच ज्याच्या जीवनाचा स्थायिभाव बनून गेलेला असतो अशा व्यक्तिमत्त्वाला सुखासीनतेची कल्पनाच करवत नाही मुळी. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आयुष्यात ...

Madhavrao Gaikwad: Conflicting Comrade | माधवराव गायकवाड : संघर्षशील कॉम्रेड

माधवराव गायकवाड : संघर्षशील कॉम्रेड

Next

संघर्ष हाच ज्याच्या जीवनाचा स्थायिभाव बनून गेलेला असतो अशा व्यक्तिमत्त्वाला सुखासीनतेची कल्पनाच करवत नाही मुळी. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आयुष्यात खासगीपण काही उरतच नाही. त्याची त्यांना अभिलाषा अगर फिकीरही नसते, कारण आपला जन्म हा आपल्या स्वत:साठी नाही हे त्यांनीच स्वीकारलेले असते. त्यामुळेच ते व्यक्ती म्हणून नव्हे, तर संस्था बनून राहतात. परिणामी रूढ अर्थाने अंत हा शब्दही त्यांना लागू होत नाही. या पंथातली माणसे असतात कमी; पण ते इतिहासाचा दस्तऐवज ठरतात. समाजवादी पक्षाच्या मुशीत घडून मार्क्सवादाकडे वळलेल्या व शेतकरी-कामगारांसाठी सतत संघर्षशील राहिलेल्या माधवराव गायकवाड यांचे नावही याच पंथात मोडणारे आहे.
राष्ट्र सेवा दलातून सार्वजनिक जीवनाची वाटचाल सुरू करून समाजवाद ते मार्क्सवाद असा सुमारे पाच ते सहा दशकांचा कृतिशील प्रवास केलेल्या कॉ. माधवराव यांचा एकूणच जीवनपट हा त्यांच्या लढवय्येपणाची साक्ष देणारा आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून गोवा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन यात सक्रिय राहिलेल्या माधवराव यांनी खंडकरी शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा स्मरणात राहणारा आहे. साखर कारखान्यासाठी खंडाने घेतलेल्या शेतक-यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून लढला गेलेला हा तब्बल चाळीसेक वर्षाचा दीर्घकालीन लढा गिनीज बुकात नोंदविला गेला. विशेष म्हणजे, राज्यातील गेल्या सरकारच्या काळात कॉ. माधवराव गायकवाड यांच्याच उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित खंडक-यांना सातबारा उताºयाचे वाटप केल्याने त्यांच्या लढ्याची फलश्रुती पाहावयास मिळाली.
आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृतराव डांगे आदी प्रमुख नेत्यांसोबत काम केल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साम्यवादी, ध्येयासक्त विचारांचा पैलू लाभून गेलेला होता, शिवाय क्रांतिसिंह नाना पाटील व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या भूमी आंदोलनातही त्यांनी पुढाकार घेतलेला असल्याने लढावूपणा त्यांच्या नसानसात भिनला होता. रेल्वे कामगारांचे आंदोलन असो, की शेतकरी-श्रमजीवींचे; अनेक लढे माधवरावांनी नेटाने लढले व संबंधिताना न्याय मिळवून दिला. या लढ्यांमुळे तरुणपणापासूनच अनेकदा त्यांना कधी भूमिगत राहून काम करण्याची वेळ आली तर दरवर्षी कोणत्या न कोणत्या आंदोलनामुळे तुरुंगातही जावे लागले; परंतु त्याने त्यांची ध्येयनिष्ठा डगमगली नाही. त्यांनी हाती घेतलेली आंदोलने तडीस नेली.
राज्यात ‘पुलोद’चा प्रयोग झाला तेव्हा १९८५ मध्ये माधवराव गायकवाड नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले होते. तत्पूर्वी १९५८ ते ६३ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य होते. या दरम्यान विरोधी पक्ष नेतेपदही त्यांनी भूषविले. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून देण्याचा निर्णय राज्य शासनाने पहिल्यांदा घेतला होता, तेव्हा ते नांदगावचे नगराध्यक्ष म्हणूनही निवडून गेले होते. कोणताही विषय अभ्यास करून मांडणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे एका अधिवेशनात, देशाला स्वातंत्र्य मिळून ४० वर्षे झाली तरी राज्यातील केवळ साडेबारा टक्केच शेतजमिनीला सरकार पाणी पुरवू शकले, या मुद्द्यावर झालेले त्यांचे भाषण त्याकाळी चर्चित ठरले होते. महसूल, अर्थ, शेती, सहकार, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक विषयांवर चौफेर फटकेबाजी करीत त्यांनी विधिमंडळात भाकपाची मशाल तेवत ठेवली होती. पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी म्हणून राज्यभर संघटन बांधणीतही त्यांनी झोकून देऊन काम केले, त्याच बळावर आज भाकप मजबुतीने उभा राहू पाहतो आहे. विचारांची दृढनिश्चयता व सातत्यपूर्ण संघर्षशीलता हाच कॉ. माधवराव गायकवाड यांचा जीवनधर्म होता. आजच्या राजकारण्यांत तेच दुर्मीळ झाले असल्याने माधवरावांचे जाणे मनाला चटका लावणारेच ठरले आहे.

Web Title: Madhavrao Gaikwad: Conflicting Comrade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.