Health facility to immigrants reaching pregnant women | स्थलांतरित गरोदर मातांपर्यंत पोहोचणार आरोग्य सुविधा
स्थलांतरित गरोदर मातांपर्यंत पोहोचणार आरोग्य सुविधा

नाशिक : यंदाच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील जीवनचक्रच बदलून गेले असून, असंख्य शेतमजुरांनी रोजीरोटीसाठी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरामध्ये गरोदर माता आणि बालकांचादेखील समावेश असल्याने माता-बालकांच्या लसीकरण आणि औषधोपचाराचे कोष्टक पूर्ण करण्यासाठी त्यांचा शोध घेण्याची मोहीम आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील गरोदर माता आणि त्यांच्या बाळाची नियमानुसार होणारी नोंदणी आणि लसीकरणाचा आढावा घेण्यात आला असून यामध्ये अनेक मातांनी स्थलांतरित गेल्याची बाब समोर आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेकांना स्थलांतर करावे लागले आहे. विशेषत: आदिवासी भागातून या महिला शहराकडे रोजीरोटीसाठी आल्याने अशा मातांचा शोध घेऊन त्यांना नियमित लसीकरण करवून घेण्याची जबाबदारी मूळ गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांची असते. त्यामुळे गावातून स्थलांतरित झालेल्या अशा प्रकारच्या मातांना शोधून त्यांना नियमित औषधोपचार आणि लसीकरणासाठीची व्यवस्था करण्याच्या सूचना आरोग्य संचालकांनी दिलेल्या आहेत.
आरोग्य सेवा संचालकांनी जिल्हानिहाय माता बाल संगोपनाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्णातून स्थलांतरित झालेल्या गरोदर माता आणि बालकांचा शोध घेऊन त्यांच्या लसीकरणाचे कोष्टक पूर्ण करण्याची जबाबदारी आधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. गरोदर मातांची नोंदणी, त्यांना टोचण्यात येणाºया लसी याचा आढावा घेतल्यानंतर ज्या मातांनी स्थलांतर केलेले आहे त्यांचा आढावा घेतल्यानंतर आदिवासी भागातून अशा प्रकारे महिलांचे स्थलांतर झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्णातून ७७ हजार मातांची नोंदणी करणे अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ज्या मातांनी अजूनही नोंदणी केलेली नाही अशा मातांचा शोध घेतला जाणार आहे.
सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता कोणत्या मातांनी स्थलांतर केले आहे याची यादी बनविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, आरोग्य सेविका आणि आशा सेविकांच्या माध्यमातून नोंदणीच्या कामाला गती दिली जात आहे. तसेच त्यांच्या माहितीच्या आधारे स्थलांतरित मातांना लसीकरणासाठी आणले जात आहे. बाळाचा जन्म होण्यापूर्वी आणि जन्मानंतरही मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्यामुळे सध्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
रक्तक्षय कमी करण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम या मोहिमेतून राबविला जात आहे. रक्त कमी असलेल्या गरोदर मातांविषयी अधिक धोका असतो. अशा प्रकारची माता आणि बाळाला कोणताही धोका पोहचू नये हे प्रमुख लक्ष्य असते. त्यादृष्टीने आरोग्य विभागाची यंत्रणा काम करीत आहे.
१०६ प्राथमिक उपकेंद्रांमध्ये काम
जिल्ह्यातील १०६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये जवळपासू ९० टक्केच्या पुढे कामकाज झाले असून, अद्यापही दहा ते बारा आरोग्य केंद्रांमध्ये अजूनही हे काम होऊ शकले नाही. अशा केंद्रांवरील नोंदणी झालेल्या मातांनी स्थलांतरित केले असेल तर त्यांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण आणि औषधोपचारासाठी पुन्हा प्रवृत्त करण्यात येणार आहे.


Web Title:  Health facility to immigrants reaching pregnant women
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.