सरकारे कोणतीही असोत, लेखकांनो व्यक्त व्हा! : वसंत आबाजी डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:21 AM2019-02-28T01:21:46+5:302019-02-28T01:22:18+5:30

आज सत्योत्तर युग आहे. सत्यानंतर येते ते असत्यच. कवी, लेखकांनी सामान्य माणसांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. आनंदाची गाणी तर आपण गातच राहातो; पण विपरित काळात काळोखाचीही गाणी गायली पाहिजे.

Governments can not be any, write the authors! : Spring belching dahake | सरकारे कोणतीही असोत, लेखकांनो व्यक्त व्हा! : वसंत आबाजी डहाके

सरकारे कोणतीही असोत, लेखकांनो व्यक्त व्हा! : वसंत आबाजी डहाके

Next

नाशिक : आज सत्योत्तर युग आहे. सत्यानंतर येते ते असत्यच. कवी, लेखकांनी सामान्य माणसांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. आनंदाची गाणी तर आपण गातच राहातो; पण विपरित काळात काळोखाचीही गाणी गायली पाहिजे. अशा परिस्थितीत तोंड बंद ठेवून चालणार नाही. व्यक्त होत राहा. सरकारे कशीही वागू शकतात. सर्वात प्रक्षोभक व बुद्धिहीन कविता तर जगभरातील सरकारेच करत आली आहेत. फक्त त्यांची भाषा वेगळी असते, ज्यामुळे सामान्य उद्विग्न व विर्दीर्ण होत जातात, असे परखड भाष्य ज्येष्ठ कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘जनस्थान’ पुरस्कार सोहळ्यात बोलताना केले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित दिमाखदार सोहळ्यात जीवनविषयक जाणिवांचे अंत:सूत्र ठाशीवपणे मांडणारे, वाचकांच्या जाणिवांच्या नव्या खिडक्या उघडणारे, मराठी साहित्यातील प्रयोगशील कवी आणि विचक्षण समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना १५व्या ‘जनस्थान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते डहाके यांना एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि ब्रॉन्झची सूर्यमूर्ती प्रदान करण्यात आली. वसंत डहाके यांनी आपल्या भाषणात कुसुमाग्रजांनीच निर्माण करून ठेवलेल्या साहित्याचा संदर्भ आजच्या परिस्थितीशी जोडत उद्विग्न व विदीर्ण करणारे वास्तव उपस्थितांसमोर मांडले. 
डहाके म्हणाले, कुसुमाग्रजांनी ‘क्रांतीचा जयजयकार’ या कवितेतून दाखविलेला जोश आणि स्वप्न आज कुठे आहे, क्रांतिकारकांचे स्मरण केले तर आपण कोणत्या काळात जगत आहोत, आपण भासाच्या जगात तर नाही ना, या प्रश्नांनी मी अस्वस्थ होतो. दुर्दैवाने आज असत्याचे युग आहे. जे वारंवार सांगावे लागते ते असत्य असते. कवी विचार करायला लागतो, अस्वस्थ होतो तेव्हा तो आंदोलित होतो. कवितेत रुपांतरित होतो. कोणताही कवी, लेखक हा समाजापासून, राजकीय प्रश्नांपासून दूर राहू शकत नाही. देशात जेव्हा काळोख असतो, तेव्हा तो व्यक्त होत असतो. कवी हा जगाचा उद्गाता असतो. कुसुमाग्रजांच्या समाजाविषयी भावना तीव्र होत्या. विषमतेने ते व्याकुळ झालेले दिसतात. ज्यात समाज सहभागी होत नाही, ती साहित्य संमेलने निरर्थकच असतात असे ते सांगत आलेले आहेत. सामान्य माणसेच भिंती उद्ध्वस्त करत असतात, ही ऊर्जा त्यांना दिसत आलेली आहे. त्यांची कविता आमच्या सोबतच आहे. आमच्या काळाला त्यांनी शब्दबद्ध केले असल्याचे सांगत त्यांनी कुसुमाग्रजांच्या समाजाविषयीच्या जाणिवा अधोरेखित केल्या. डहाके यांनी भाषांविषयीही चिंता व्यक्त केली. भाषेचा प्रश्न अभिमानापेक्षा कृतीने सोडविण्याची गरज आहे. ती कृती शासनाने, समाजाने केली पाहिजे. आपण जागरुक नसलो तर भाषेचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
कुसुमाग्रजांनी व्यक्त होताना कसलीही पर्वा केली नाही. बोलणे हेच कवी, लेखकाचे काम असते. कवींनी बोलूच नये, त्यांनी फक्त आमची स्तुतीच करावी, अशी अपेक्षा राज्यकर्त्यांची असते; परंतु कवी, लेखक जे बोलतो ते समाजाच्या तळमळीतूनच बोलत असतो. कुसुमाग्रज आज हयात असते तर त्यांना झुंडी दिसल्या असत्या, त्यांच्या हातून घडणाऱ्या हत्या दिसल्या असत्या. रक्ताची थारोळी साचली की भविष्याकडे जाणारी पावलेही रक्ताने माखलेली असतात. माणसंही मुकी झाली तर त्यांची दशा जनावरांसारखी होईल. आता अंधाराचे साम्राज्य आहे. अशा स्थितीत सामान्यांच्या मनात हलकीशी ज्योत तेवत ठेवण्याचे काम कवी, लेखकांनी करत राहावे. तोच माणसाचा धर्म आहे आणि आपण माणूस आहे, हे कवी, लेखकांनी विसरू नये, असे भानही डहाके यांनी आणून दिले.
दरम्यान, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी, साहित्यिक हा केवळ कागदावर लिहीत नाही तर तो समाजाला दिशा देत असतो, उन्नत करत असतो, असे सांगत जनस्थान पुरस्कार हा कुसुमाग्रजांचाच आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले. मानपत्र वाचन व सूत्रसंचालन स्वानंद बेदरकर यांनी केले. क.का. वाघ ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थी व संगीत शिक्षकांनी सादर केलेल्या कुसुमाग्रजांच्या ‘प्रकाशदाता-जीवनदाता’ या सूर्याच्या प्रार्थनेने सोहळ्यास सुरुवात झाली तर ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. व्यासपीठावर नाशिकच्या महापौर रंजना भानसी, ज्येष्ठ कवयित्री व डहाके यांच्या पत्नी प्रभा गणोरकर, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संजय भास्कर जोशी, प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे यांच्यासह विश्वस्त गुरुमित बग्गा, विनायक रानडे, अरविंद ओढेकर, डॉ. विनय ठकार आदी उपस्थित होते. कालिदास कलामंदिराच्या आवारात चित्रकार अनिल माळी यांनी जनस्थान पुरस्कारप्राप्त सारस्वतांची रेखाटलेली स्केचेस लावण्यात आली होती.
इन्फो
मराठी उपजीविकेची भाषा व्हावी
वसंत डहाके यांनी मराठी भाषेविषयीही आपले मत परखडपणे मांडले. डहाके म्हणाले, समाज भाषेशिवाय जिवंत राहणे अशक्य आहे. मराठी भाषेला वैभव प्राप्त होत नाही, याला आपणच जबाबदार आहोत. कडकडून जाग यावी, असे काही घडत नाही. जागतिक मराठी हा आपल्या अस्मितेचा विषय असला पाहिजे. मराठी ही ज्ञानभाषा आणि उपजीविकेची भाषा बनली पाहिजे. परंतु, याची उत्तरे नकारार्थीच येतात, अशी खंतही डहाके यांनी व्यक्त केली.
भाषा जपणारे हात कलम करू नका
डहाके यांनी मराठी भाषा शिकविणारे अनेक मुले महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर काम करत असल्याचे भीषण वास्तव समोर मांडले. या मुलांना अपुरे वेतन दिले जाते. अनेकांना नोकऱ्या नाहीत. जे हात भाषा जपण्यासाठी पुढे येतात, ते कलम करु नका. निदान त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करा. भाषेविषयीचा अभिमान नुसता दाखविण्यासाठी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डहाकेंच्या कवितेचा स्वर विश्ववात्सल्याचा- जोशी
निवड समितीचे अध्यक्ष संजय भास्कर जोशी यांनी डहाके यांच्या कवितांचे मर्म उलगडून दाखविले. जोशी म्हणाले, डहाके यांची ‘योगभ्रष्ट’ ही कविता अस्वस्थ आत्म्याचे उद्गार आहे. ती केवळ आक्रंदन करणारी नव्हे तर तिचा खरा स्वर विश्ववात्सल्याचा आणि करुणेचा आहे. त्यांच्या कवितांमध्ये निसर्गही डोकावतो. त्यांच्या कवितेला भावूकतेचा, बेगडी आशावादाचा स्पर्श नाही. त्यांचे लेखन वाचताना माणूस म्हणून आपण समृद्ध होत जातो, असे गौरवोद्गारही जोशी यांनी काढले.
पुरस्काराचा सुंदर क्षण
डहाके यांनी आजचा पुरस्काराचा क्षण सुंदर असल्याचे सांगत त्यामागे कुसुमाग्रज असल्याने अधिक आनंद असल्याची भावना व्यक्त केली. कुसुमाग्रज हे छाया देणारे झाड आहे. त्यांच्या लेखनात दुसऱ्यांना खुरटं करण्याची बिजे नाहीत. त्यांनी नेहमीच दुसºयाने अधिक उंच व्हावे, अशा जाणिवा पेरल्या असल्याचेही सांगत कुसुमाग्रजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Governments can not be any, write the authors! : Spring belching dahake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.