लहवितजवळील एअरफोर्सचे गेट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:21 AM2019-06-08T00:21:57+5:302019-06-08T00:22:16+5:30

लहवितजवळील साउथ एअरफोर्स गेट बंद केल्याने परिसरातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी अडचण होत आहे. पूर्वीचा शिवरस्ता  पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी एअरफोर्सचे एअर कमांडंट रविकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली.

 Gate shutdown of Air Force near Poonch | लहवितजवळील एअरफोर्सचे गेट बंद

लहवितजवळील एअरफोर्सचे गेट बंद

Next

देवळाली कॅम्प : लहवितजवळील साउथ एअरफोर्स गेट बंद केल्याने परिसरातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी अडचण होत आहे. पूर्वीचा शिवरस्ता  पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी एअरफोर्सचे एअर कमांडंट रविकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली.
लहवित येथे एअरफोर्स हद्दीत पूर्वीचा शिवरस्ता असून, येथील गेटमधून परिसरातील रहिवासी ये-जा करतात. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव २५ ईडी साउथ देवळाली एअरफोर्स डेपोच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापासून शिव रस्त्यावरील गेट बंद केल्याने गावातील १२५ कामगारांना त्याचा रोज त्रास सहन करावा लागत आहे. लहवित भागात सेवानिवृत्त कर्मचारी राहत असल्याने त्यांना पेन्शन, गॅस, कॅन्टीन येथे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता होता. तसेच २००हून अधिक विद्यार्थी एअरफोर्स शाळेत शिक्षण घेतात. देवळाली कॅम्पला जाणाºया शहर वाहतूक बसेस येथून येत-जात असल्याने त्याचा सर्वांनाच फायदा होत होता. मात्र एअरफोर्स हद्दीतील शिव रस्त्यावरील गेट सुरक्षिततेच्या कारणास्तव महिनाभरापासून बंद करण्यात आल्याने सर्वांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार, शेतकरी, ग्रामस्थ यांना नऊ किलोमीटरचा लांबचा फेरा मारून ये-जा करावी लागत आहे.
एअरफोर्स हद्दीतील रहिवासी, महिला दररोज सायंकाळी लहवित येथे किराणा, भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तू व रुग्णालयात या मार्गे ये-जा करत होते. मात्र शिव रस्त्यावरील गेट बंद करण्यात आल्याने रहिवाशांची मोठी परवड होत आहे. तसेच लहवित परिसरातील व्यावसायिकांच्या व्यवसायावरदेखील परिणाम झाला आहे.
गैरसोय दूर करण्याची मागणी
खासदार हेमंत गोडसे यांनी यासंदर्भात एअरफोर्सचे एअर कमांडंट रविकुमार शर्मा यांची भेट घेऊन ग्रामस्थ, कर्मचारी आदींची होणारी गैरसोय यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी शर्मा यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव गेट बंद करण्याचा निर्णय संरक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने घेतला असल्याने स्थानिक ठिकाणी गेट पुन्हा सुरू करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी गोडसे यांनी एअरफोर्सच्या वरिष्ठ कार्यालयाकडून ना-हरकत दाखला लवकरात लवकर आणून दिल्यानंतर ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी त्वरित गेट पूर्ववत सुरू करावे, असे सांगितले.

Web Title:  Gate shutdown of Air Force near Poonch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.