पूर्व भागालाही दुष्काळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:29 AM2019-05-18T00:29:07+5:302019-05-18T00:29:23+5:30

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील गावांनाही यंदा पहिल्यांदाच बसला असून, दारणा, गोदावरीसारख्या नद्या असूनदेखील एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरेगाव या पंचक्रोशीतही दुष्काळाचा दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. भर दुपारी कडक उन्हामुळे ग्रामीण भागात चिटपाखरूदेखील दृष्टीस पडत नाही.

 The eastern part also caused drought | पूर्व भागालाही दुष्काळाचा फटका

पूर्व भागालाही दुष्काळाचा फटका

Next

एकलहरे : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील गावांनाही यंदा पहिल्यांदाच बसला असून, दारणा, गोदावरीसारख्या नद्या असूनदेखील एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरेगाव या पंचक्रोशीतही दुष्काळाचा दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. भर दुपारी कडक उन्हामुळे ग्रामीण भागात चिटपाखरूदेखील दृष्टीस पडत नाही.
वाढत्या उन्हामुळे शेतीकामासाठी शेतकरी वर्ग सकाळी दहाच्या आधी व दुपारी चारनंतर शेती कामे करतात, तर व्यापारी, दुकानदार सायंकाळी आपापले व्यवहार सुरू करतात. शेळ्या, मेंढ्यांचे कळप झाडा झुडपांच्या सावलीच्या आडोशाने पाला पाचोळा खाऊन तेथेच विसावतात. गाई, गुरे पिण्याच्या पाण्याची वाट बघत झाडाखाली विसावतात. नाशिक तालुका पूर्व भागातील अनेक गावे दारणा व गोदावरी नदीच्या आसपास असल्याने नद्यांना आवर्तन सोडले तरच पिकांना पाणी देऊ शकतात.
पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे यंदा विहिरींना कमी पाणी आले. ऐन उन्हाळ्यात या विहिरींनीही तळ गाठला आहे. ज्या ठिकाणी विहिरींना पाणी आहे ते पाणीटंचाईग्रस्त गावांची तहान भागवित आहेत. सामनगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी एकलहरे वीज केंद्र प्रशासनाकडून दारणेचे पाणी पिण्यासाठी दिलेले आहे. एक दिवस गावासाठी व एक दिवस मळे विभागासाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील कोटमगाव व जाखोरी परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था विजेच्या लपंडावाने दयनीय झाली आहे. दारणा नदीच्या काठावर असलेल्या या गावांना पाण्याचे रोटेशन सोडले नाही तर गावकऱ्यांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळू शकत नाही. दुसरीकडे पाण्याचे रोटेशन सोडले तर विजेअभावी त्या पाण्याचा वापर करता येत नाही. वीज कंपनीने थ्री फेज लाइट बंद केल्याने शेतीसाठी व पिण्यासाठीही पाणी उचलता येत नाही. अशा परिस्थितीत कोटमगावचे सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी विनामोबदला गावाला पिण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. नदीचे पाणी वापरता येत नाही, तर दुसरीकडे अनेक विहिरींनी तळ गाठला असल्याने शेतात उभ्या पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. मका, घास, कोबी, फ्लॉवर आदी पिके कोमेजून गेली आहेत. उन्हाच्या कडाक्याने चाळीत साठवलेला कांदा काही प्रमाणात सडू लागला आहे. एकलहरे येथील सिद्धार्थनगर भागात पिण्याच्या पाणी एकलहरे वीज निर्मिती कंपनी प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे. मात्र सुमारे पाच हजार नागरिकांना ते पुरत नाही. एक तास पाण्याचा पुरवठा होतो. काही भागांत पाणी पोहचत नाही. त्यामुळे दुपारी तीन वाजता येणाºया पाण्यासाठी सकाळपासूनच टाकीजवळ हंडे, बादल्या, कॅन ठेवून नंबर लावला जातो. वापरण्यासाठी बोअरवेलचे पाणी पुरविले जाते. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे.
स्थानिकांना उपयोग नाही
एकलहरे गाव व परिसरात गोदावरीच्या पाण्याचा वापर केला जातो. गोदावरीचे पाणी शेती व वापरण्यासाठी,तर दारणेचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. येथेही वीजपुरवठ्याची समस्या आहे. त्यामुळे पाणी असूनही नागरिकांना ते वापरता येत नाही.
४दुष्काळी परिस्थितीमुळे धरणातील पाण्याचा साठा कमी झाला असल्याने नगर, औरंगाबादसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले जाते. ते पाणी स्थानिकांना वापरता येत नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title:  The eastern part also caused drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.