महापालिका आयुक्तांवरच फौजदारी कारवाईची मागणी

By admin | Published: November 18, 2015 11:55 PM2015-11-18T23:55:38+5:302015-11-18T23:56:09+5:30

निवेदन : घंटागाडी कामगार वेतनप्रश्नी आक्रमक

Demand for criminal action on municipal commissioners | महापालिका आयुक्तांवरच फौजदारी कारवाईची मागणी

महापालिका आयुक्तांवरच फौजदारी कारवाईची मागणी

Next

नाशिक : न्यायहक्कासाठी लढणाऱ्या घंटागाडी कामगारांचे आंदोलन फौजदारी गुन्हे दाखल करत दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि कामगार कायद्याचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि आरोग्याधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी घंटागाडी कामगारांच्या श्रमिक संघाने कामगार आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी निवेदनात म्हटले आहे, सुधारित किमान वेतनाबाबत कामगार उपआयुक्त कार्यालयाने सातत्याने सूचना देऊनही महापालिका प्रशासनाने त्यासंबंधी कार्यवाही केलेली नाही. उलट वेतन मागणीसाठी कामगार लढा देत असताना त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
घंटागाडी कामगार ३० आॅक्टोबरपासून पालिकेसमोर धरणे आंदोलन करत आहेत परंतु पालिकेने त्याकडे दुर्लक्ष करण्याचेच धोरण अवलंबिले आहे. संबंधित ठेकेदारांनीही कामगार आयुक्त कार्यालयाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शासनाच्या निर्णयालाच आव्हान दिले आहे. तथाकथित ठेकेदारांनी कुंभमेळ्यात घेतलेल्या ठेक्यात कामगार उपआयुक्त कार्यालयातून परवाना न घेताच बेकायदेशीर व्यवहार केलेला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांचेही परवाने रद्द करत त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कामगार आयुक्तालयाने २०११ मध्ये पालिकेचा नोंदणी दाखला रद्द करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठविला असतानाही पालिकेचे अधिकारी पुन्हा पुन्हा कामगार आयुक्तालयाचे आदेश पाळत नसल्याचेही श्रमिक संघाने म्हटले आहे. त्यामुळे आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवरही फौजदारी कारवाईची मागणी श्रमिक संघाने केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for criminal action on municipal commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.