अतिसारामुळे राहुडेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:35 AM2018-07-10T01:35:32+5:302018-07-10T01:35:58+5:30

Death of one in the house due to diarrhea | अतिसारामुळे राहुडेत एकाचा मृत्यू

अतिसारामुळे राहुडेत एकाचा मृत्यू

Next

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे अतिसारसदृश आजाराची लागण झाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, ७५ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. यातील सात जणांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील दूषित पाण्यामुळे गावात अतिसार पसरल्याची प्राथमिक माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  सुरगाणा तालुक्यातील मौजे राहुडे येथे अतिसारसदृश आजाराने थैमान घातले असून, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. गावामध्ये एकूण १३१ घरे असून, सुमारे ९०० इतकी लोकसंख्येचे हे गाव आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने रुग्णांची संख्या ७५ असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात सुमारे १५०च्या पुढे रुग्ण असल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. अतिसारामुळे नामदेव मोतीराम गांगुर्डे या ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आली. पिण्याचे पाणी सुरक्षित करण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात आली आहे. विशेषत: दूषित पाणी झालेल्या विहिरीची स्वच्छता करण्याबरोबरच पाणी स्वच्छ करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट
सुरगाणा तालुक्यात अतिसाराची लागण झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर आणि सदस्य धनराज महाले यांनी रुग्णांची चौकशी केली. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडून उपचाराची माहिती घेतली. अध्यक्ष सांगळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे यांना तातडीने राहुडेत जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या.
पाणी शुद्धीकरणाची वहीच गायब
गाावात आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. आरोग्य पथकाने पाणी शुद्धीकरण नोंदीची मागणी केली असता संबंधित वहीच उपलब्ध होऊ शकली नाही. ग्रामपंचायतस्तरावर पाणी शुद्धीकरण नोंदणी पथकाने तपासली असता १ जून २०१८ पूर्वीची पाणी शुुद्धीकरण नोंद असलेली नोंदवहीच ग्रामपंचायतीत उपलब्ध होऊ शकली नाही.
अतिसाराची लागण झाली म्हणून राहुडे येथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला रुग्ण नामदेव गांगुर्डे यास फुफ्फुसाचा विकार अगोदरच होता. त्याचा रोग अधिकच बळावला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अतिसारामुळे नव्हे तर फुफ्फुसाचा विकारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Death of one in the house due to diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.