ग्राहकांची देशी बनावटीच्या कुलरला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:31 PM2019-03-23T23:31:47+5:302019-03-24T00:17:06+5:30

तापमान वाढू लागल्याने नागरिकांकडून कुलरची खरेदी होत असून, नामांकित कंपनींच्या कुलरसोबतच स्थानिक उत्पादकांच्या देशी बनावटीच्या (डेझर्ट) कुलरची मागणी वाढली आहे.

Customer Custom Area | ग्राहकांची देशी बनावटीच्या कुलरला पसंती

ग्राहकांची देशी बनावटीच्या कुलरला पसंती

Next

नाशिक : शहरात डिसेंबर-जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीनंतर यंदा फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने दिवसेंदिवस अंशाअंशाने तापमानात वाढ झाली असून, मार्चच्या मध्यातच कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांवर गेल्याने नाशिककरांची काहिली होऊ लागली आहे. तापमान वाढू लागल्याने नागरिकांकडून कुलरची खरेदी होत असून, नामांकित कंपनींच्या कुलरसोबतच स्थानिक उत्पादकांच्या देशी बनावटीच्या (डेझर्ट) कुलरची मागणी वाढली आहे.
डेझर्ट कुलर म्हणजे तिन्ही बाजूंनी फक्त लोखंडी आणि गवताच्या जाळीने आच्छादलेला कुलर असून, गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या तोंडावर अशा डेझर्ट कुलरची मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागल्याने शहरातील विविध भागात या कुलरचे उत्पादन होत आहे. तिन्ही बाजूंनी हवा आपल्याकडे ओढून समोरच्या बाजूने गारेगार हवा फेकण्याचे काम हा कुलर करतो. नामांकित कुलरमध्ये तिन्ही बाजू बंद असतात. त्यामुळे कडक उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी डेझर्ट कुलरला प्राधान्य दिले जाते. हे कुलर्स नामांकित कंपन्यांच्या तुलनेत केवळ पंधराशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत परवडणाऱ्या किमतीत मिळतात. कुलरच्या आकारानुसार त्यात वाढ होते. यात दोन फुटांपासून ते चार फूट आकारांचे कुलर्सही बाजारात उपलब्ध असून, साधारणत: हे कुलर शंभर फुटांपासून सहाशे चौरस फूट हॉल अथवा खोलीसाठी पुरेसे असतात. त्याचप्रमाणे असे कु लर बनविणारे व्यावसायिक ग्राहकाच्या गरजेप्रमाणेही कुलर बनवून देत असल्याने नागरिकांकडून या कुलर्सला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी फायदेशीर
उन्हाळ्यात झोपडपट्टी व पत्र्यांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवतो. अशा वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना एअरकंडिशनर (एसी) बसविणे शक्य होत नाही. तर कडक उन्हाळ्यात नामांकित कंपन्यांचे कुलर व पंखे तग धरू शकत नाही. त्यांची दुरुस्ती देखभालही परवडणारी नसल्याने नागरिकांकडून सध्या डेझर्ट कुलर्सला मागणी वाढली आहे. डेझर्ट कुलरची किंमत आवाक्यात असल्याने अल्प उत्पन्न गटात या कुलरला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
व्यावसायिकांना आर्थिक अडचणी
गेल्या दोन-तीन वर्षांत नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका बसल्यामुळे कच्च्या मालाची खरेदी करून उत्पादन घेणे या व्यवसायातील व्यावसायिकांना अवघड झाले होते. परंतु यावर्षी परिस्थिती सुधारली असून, शहरातील विविध भागात अशा प्रकारचे डेझर्ट कुलर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. परंतु, हा कुलर तयार करण्यासाठी लागणारा पत्रा, अँगल, जाळी, पाण्याची मोटार, हवेची मोटार आदी साहित्याच्या किमतींमध्ये १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ग्राहक अशा कुलरची मागणी करीत असले तरी वाढीव किंमत देण्यास लवकर तयार होत नसल्याने व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Customer Custom Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.