नाशकात युती-आघाडीला बंडखोरीची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 05:05 AM2019-07-07T05:05:53+5:302019-07-07T05:05:56+5:30

इच्छुकांची कार्यालयात गर्दी वाढली । मनसे, वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक

Alliance-led alliance in Nashik faces threat of insurgency | नाशकात युती-आघाडीला बंडखोरीची धास्ती

नाशकात युती-आघाडीला बंडखोरीची धास्ती

Next

श्याम बागुल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजप, सेना व राष्टÑवादीने प्रत्येकी चार जागांवर विजय मिळविला. तर कॉँग्रेस दोन जागांवर आणि माकपच्या वाट्याला एक जागा आली. लोकसभा निवडणुकीनंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षापुढे आहे त्या जागा टिकविण्याचे मोठे आव्हान असून, पक्षांतर्गत इच्छुकांची वाढलेली संख्या पाहता सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण होण्याची शक्यता आहे.


जिल्ह्याचे राजकीय नेतृत्त्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आल्यापासून नाशिकचे नाव राजकीय पटलावर कायमच चर्चेत राहिले असले तरी, त्यामुळे राष्टÑवादीची खूप भरभराट झाली, असे नाही. त्यांनी त्यांचा स्वत:चा येवला व पुत्राचा नांदगाव मतदारसंघ सलग तीन वेळा राखला. मात्र मध्यंतरी मतदारसंघाशी तुटलेल्या संपर्कामुळे यंदा या दोन्ही मतदारसंघात भुजबळ कुटुंबीयांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत. येवल्यात छगन भुजबळ यांना संभाजी पवार यांच्याकडून आव्हान दिले जाऊ शकते तर नांदगावला भाजपचे रत्नाकर पवार अथवा त्यांची पत्नी मनीषा पवार हे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. निफाड मतदारसंघावर शिवसेनेचे अनिल कदम यांनी सलग दोन वेळा वर्चस्व कायम राखले आहे. त्यांची लढत पुन्हा एकदा राष्टÑवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्याशी होण्याची शक्यता असली तरी, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनीही त्यादृष्टीने तयारी चालविली आहे. चांदवड मतदारसंघाने नेहमीच भाकरी फिरवत ठेवली आहे. सध्या भाजपाचे डॉ. राहुल आहेर हे प्रतिनिधित्व करीत असले तरी, त्यांना स्वपक्षातूनच डॉ. आत्माराम कुंभार्डे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत. कॉँग्रेसकडून माजी आमदार शिरीष कोतवाल, राष्टÑवादीकडून उत्तम भालेराव व जि. प. सदस्य सयाजीराव गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. बागलाण मतदारसंघात यंदा कडवी झुंज होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्टÑवादीच्या आमदार दीपिका चव्हाण व खासदार सुभाष भामरे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते पाहता, चव्हाण यांना भाजपकडून कडवे आव्हान दिले जाऊ शकते. त्याचबरोबर या मतदारसंघातून शेतकरी संघटनेकडूनही उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता आहे.
मालेगाव बाह्य व मध्य या विशेष चर्चेत राहणाऱ्या मतदारसंघापैकी बाह्यमध्ये राज्यमंत्री दादा भुसे व काँग्रेसचे आसिफ शेख हेच पुन्हा उमेदवार असतील. त्यातही भुसे यांची मतदारसंघावर असलेली पकड पाहता, विरोधकांची कसोटी लागणार आहे. तर मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे चिन्हे आहेत. विद्यमान आमदार आसिफ शेख यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवार दिला जाईल, त्याचबरोबर समाजवादी पक्ष व एमआयएमकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. कळवण-सुरगाणा या आदिवासी मतदारसंघातही यंदा विधानसभेला चुरस होईल. कॉँग्रेस आघाडीसोबत माकपा गेली तर विद्यमान आमदार जे. पी. गावित हेच पक्षाचे उमेदवार असू शकतील. पण तसे न झाल्यास राष्टÑवादीकडून या ठिकाणाहून जि. प. सदस्य नितीन पवार वा त्यांची पत्नी जयश्री पवार उमेदवारी करू शकतात तर भाजपकडून विद्यमान खासदार भारती पवार यांचे पती प्रवीण पवार हेदेखील संभाव्य उमेदवार म्हणून समोर येत आहेत. या लढतीत दिवंगत ए. टी. पवार यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पेठ-दिंडोरी मतदारसंघात राष्टÑवादीकडून विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ हे उमेदवार असतील, परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादीत प्रवेश केलेले माजी आमदार धनराज महाले यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने राजकीय सोय म्हणून विधानसभेची त्यांना उमेदवारी मिळू शकते.


नाशिक शहरातील चारही मतदारसंघांवर युतीचे वर्चस्व असले तरी, इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरी व राजी-नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांनाच अधिक बसण्याची शक्यता आहे. मध्य मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे निवडूण आल्या आहेत. माजी आमदार व भाजपचेच वसंत गिते यांची या मतदारसंघावर नजर आहे. नाशिक पूर्वमध्ये भाजपचे आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना विरोधकांपेक्षा स्वकीयांकडूनच धोका अधिक असून, गणेश गिते, सुनील आडके, उद्धव निमसे आदींनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.

२०१४ मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय : मालेगाव : दादाजी भुसे (शिवसेना) एकूण मते- ८१,८२५; फरक ४७,८१३
सर्वांत कमी मताधिक्क्याने पराभव । बागलाण : दिलीप बोरसे (भाजप)- ४,१८१ ( विजयी- दीपिका चव्हाण- राष्टÑवादी कॉँग्रेस)
एकूण जागा : १५ । सध्याचे बलाबल
भाजप-४, राष्ट्रवादी-४, काँग्रेस-२, शिवसेना-४, माकपा-१

Web Title: Alliance-led alliance in Nashik faces threat of insurgency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.