२७ पॉलिटेक्निक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:00 AM2019-04-21T01:00:09+5:302019-04-21T01:00:25+5:30

दहावीनंतर तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागा राज्यातील महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने राज्यातील तब्बल २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे यावर्षी महाविद्यालय बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले असून, यात नाशिक विभागातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

 27 polytechnic colleges shut down | २७ पॉलिटेक्निक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर

२७ पॉलिटेक्निक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर

Next

नाशिक : दहावीनंतर तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागा राज्यातील महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने राज्यातील तब्बल २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे यावर्षी महाविद्यालय बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले असून, यात नाशिक विभागातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिकमधील जवळपास सातशे ते आठशे जागांसह राज्यातील तब्बल ५ हजार जागा कमी होण्याचे संकेत आहेत.
तंत्रनिकेतन महाविद्यालयांना रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या फीमध्ये महाविद्यालयांचा खर्च भागविणे कठीण झाले असून, काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशच होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांना शिक्षकांचे वेतन व अन्य खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध होत नसल्याने राज्यातील अशा २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून महाविद्यालय बंद करण्याचे प्रस्ताव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) सादर केले आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आले असले तरी ही महाविद्यालये थेट बंद करता येणार नसल्याचे संचालनालयाकडून सांगण्यात येत असून, महाविद्यालयातील शिकणाºया विद्यार्थ्यांची सुविधा, कर्मचारी, अन्य बाबी तपासून महाविद्यालय बंद करण्यासंदर्भात विचार केला जाईल. महाविद्यालये बंद करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने वर्षनिहाय राबवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विद्यार्थीच नसतील ती महाविद्यालये तत्काळ बंद होण्याची शक्यता आहे. दहावीनंतर तंत्रशिक्षण पदविका घेऊन विद्यार्थी बाहेर पडत होते. मात्र आता या अभ्यासक्रमांना दहावीच्या निकालाचा टक्का वाढल्याने उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षी अभ्यासक्रमाच्या तब्बल ७२ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यामध्ये नाशिक विभागातील मनमाड येथील शेजवळ पॉलिटेक्निक, जळगाव येथील एसएमटी पॉलिटेक्निक व डी फार्मसी आणि जीएस रायसोनी पॉलिटेक्निक महाविद्यालयांचा समावेश आहे.
विद्यार्थी दहावीनंतर आयटीआय, द्विलक्षी अभ्यासक्रमाकडे असलेला ओढा आणि बारावीनंतर बी.एस्सी आयटी, बीएमएस यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाची ओढ यामुळे या पदविका अभ्यासक्रमाला फटका बसत आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार तंत्रशिक्षण पदविकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्रिकीच्या एकूण जागांच्या २० टक्के जागांवर थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जात होता. परंतु, यातील १० टक्के जागा कमी झाल्याने आता पदवी प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार असल्याने विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षण पदविकेला प्रवेश आणखी घटण्याची शक्यता ओळखून राज्यातील २७ संस्थांनी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविली जात आहे.

Web Title:  27 polytechnic colleges shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.