नाशिक शहरातील १६६ मंगलकार्यालये, लॉन्स अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:12 PM2018-01-22T16:12:30+5:302018-01-22T16:13:04+5:30

नगररचनाचे सर्वेक्षण : महापालिकेने बजावल्या नोटीसा

 166 Mangalakaryas in the city of Nashik, the lawns are unauthorized | नाशिक शहरातील १६६ मंगलकार्यालये, लॉन्स अनधिकृत

नाशिक शहरातील १६६ मंगलकार्यालये, लॉन्स अनधिकृत

Next
ठळक मुद्देसर्वाधिक ६५ मंगलकार्यालये व लॉन्सची संख्या एकट्या पंचवटीत आढळून आली आहेत. महापालिकेने आता या अनधिकृत मंगलकार्यालये व लॉन्स यांना नोटीसा बजावल्या आहेत.ब-याच मंगलकार्यालयांकडून महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही

नाशिक - महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नियमबाह्य व अनधिकृतपणे वापर असलेले १६६ मंगल कार्यालये व लॉन्स आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६५ मंगलकार्यालये व लॉन्सची संख्या एकट्या पंचवटीत आढळून आली आहेत. महापालिकेने आता या अनधिकृत मंगलकार्यालये व लॉन्स यांना नोटीसा बजावल्या आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणावर मंगलकार्यालये व लॉन्स आहेत. प्रामुख्याने, पंचवटीतील औरंगाबादरोडवर तर शेतक-यांनी पुढे मंगलकार्यालय-लॉन्स आणि मागे शेती असा व्यवसाय थाटलेला आहे. त्यातील ब-याच मंगलकार्यालयांकडून महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही तर अनेकांकडून महापालिकेला घरपट्टीही अदा केली जात नाही. त्यामुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणावरील महसूल बुडतो आहे. याशिवाय, शहरातील अनेक मंगलकार्यालयांनी अनधिकृतपणे बांधकाम केल्याच्याही तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या आहेत तर काही जागांवर नियमबाह्यपणे अनधिकृतपणे वापर सुरू आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील सर्व मंगलकार्यालये व लॉन्सचा विभागनिहाय सर्वे केला. त्यामध्ये तब्बल १६६ मंगलकार्यालये व लॉन्स अनधिकृत आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संख्या पंचवटीत ६५ इतकी आढळून आलेली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने आता या मंगलकार्यालये व लॉन्सचालकांना नोटीसा बजावल्या असून मुदतीत त्यांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले नाही अथवा अनधिकृत नियमबाह्य वापर थांबविला नाही तर अतिक्रमण विभागाकडून पोलिस बंदोबस्तात कारवाई केली जाणार आहे. नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात नामांकीत लोकांचे मंगलकार्यालये व लॉन्स अनधिकृत आढळून आलेली असून त्यात आजी-माजी नगरसेवकांच्या मालकीच्या मंगलकायालये-लॉन्सचाही समावेश आहे.
विभागनिहाय संख्या
विभाग                      संख्या
सातपूर                       ०६
टीपीस्कीम-२              १५
सिडको                      १९
पंचवटी                      ६५
पूर्व                             १४
गावठाण                    ०९
पाथर्डी                       १४
नाशिकरोड               २४
एकूण                      १६६

Web Title:  166 Mangalakaryas in the city of Nashik, the lawns are unauthorized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.