दोन आठवड्यातच अतिक्रमण ‘जैसे थे’

By admin | Published: March 27, 2017 12:09 AM2017-03-27T00:09:14+5:302017-03-27T00:09:14+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिखाऊपणा : तिन्ही चौफुलींवरील स्थिती

In two weeks encroachment was like ' | दोन आठवड्यातच अतिक्रमण ‘जैसे थे’

दोन आठवड्यातच अतिक्रमण ‘जैसे थे’

Next

नंदुरबार : दोन आठवड्यांपूर्वी वाघेश्वरी चौफुलीवरील काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. दर दोन वर्षांनी असे प्रकार सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा नाकर्तेपणा की, अतिक्रमणधारकांची मुजोरी? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशीच स्थिती कोरीट चौफुली व नवापूर रोड चौफुलीवरील आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे या भागात अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे.
शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया वाघेश्वरी चौफुलीवर साक्री, नवापूर, धुळे तसेच वळण रस्ते येत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी विविध विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय थाटले आहेत. परिणामी चौफुलीवर वर्दळ वाढली आहे. त्याचा परिणाम अपघात वाढण्यात झाला आहे. हा परिसर व येथे येणारे सर्व रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे बांधकाम विभागातर्फे या रस्त्यांची निगा राखणे, डागडुजी करणे, ठरावीक काळानंतर नवीन रस्ते तयार करणे, अशी कामे करावी लागतात. शिवाय अतिक्रमण वाढले असल्यास ते लागलीच काढण्याची मुभादेखील या विभागाला असते. वाघेश्वरी चौफुलीच्या चारही बाजूंनी असलेले अतिक्रमण दोन आठवड्यांपूर्वी बांधकाम विभागाने काढले होते. जवळपास ३० ते ४० कच्ची अतिक्रमणे नेस्तानुभूत करण्यात आली होती. काहींनी स्वत:हून टपरी, लहान दुकाने, हातगाडीवरील दुकान काढून घेतले होते. त्यामुळे हा परिसर विस्तृत व मोकळा झाला होता. परिणामी वाहनांना उभे राहण्यास जागा तसेच प्रवाशांनादेखील ते सोयीचे झाले होते. अतिक्रमण काढल्यानंतर लागलीच त्या ठिकाणी काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करणे आवश्यक असताना ते करण्यात आले नाही. शिवाय पुन्हा अतिक्रमण होणार     नाही, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.
पुन्हा जैसे थे...
अतिक्रमण काढलेल्या जागी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या जागेवर जी टपरी, दुकान होते, ते पुन्हा ठेवण्यात आले आहे. याशिवाय मांस विक्रेत्यांनीदेखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे प्रयोजन काय होते, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. चौफुलीच्या चारही भागांत ३० ते ४० जणांनी दोन दिवसांत पुन्हा अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळ, गतिरोधकाचा अभाव यामुळे अपघातदेखील वाढले आहेत.
वाहतूक पोलिसांनाही ताण
या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येते. परंतु चारही बाजूंनी अतिक्रमणामुळे त्यांनाही रहदारी नियमन करताना ताण सहन करावा लागतो.
 

Web Title: In two weeks encroachment was like '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.