Additional requirement of 250 MW electricity for Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्याला २५० मेगावॅट विजेची अतिरिक्त आवश्यकता
नंदुरबार जिल्ह्याला २५० मेगावॅट विजेची अतिरिक्त आवश्यकता

ठळक मुद्देउन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून सद्य स्थितीत जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नंदुरबार शहरातदेखील आठ मेगावॅटची मागणी आहे.राज्यात सध्या १९ हजार ४३३ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे.

नंदुरबार - उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून सद्य स्थितीत जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नंदुरबार शहरातदेखील आठ मेगावॅटची मागणी आहे.

सध्या जिल्ह्यात नंदुरबार, विसरवाडी, तळोदा, शहादा तसेच समशेरपूर या पाच अतिउच्चदाब असलेल्या उपकेंद्रातून तसेच ५८ विविध ठिकाणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी वाढली होती. ती साधारणत ३०० मेगावॅटपर्यंत गेलेली होती. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मे-जूनपर्यंत विजेच्या मागणीत अधिक वाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात १९ हजार ४३३ मेगावॅट विजेची आवश्यकता

राज्यात सध्या १९ हजार ४३३ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. सध्या राज्यात कोळशाचा पुरवठा बऱ्यापैकी होत असल्याने विजेची टंचाई भासणार नसल्याचे महावितरणच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एप्रिल महिना पूर्ण तसेच मे व जूनपर्यंत ही मागणी २१ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वसाधारण दिवसांमध्ये राज्यात १५ हजार ६०० मेगावॅटपर्यंत वीजेची आवश्यकता असते. वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. पाण्याअभावी पीक वाया जाण्याच्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या संख्येने कृषीपंपाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच कृषिपंपासाठी मोठ्या प्रमाणात वीजेची आवश्यकता असते़ ग्रामीण भागात वीज बचत करण्यासाठी अनेक वेळा भारनियमनाचा मार्गदेखील अंमलात आणला जात असतो. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कृषीपंपाचा वापर वाढला असल्याने मुख्यत्वे दिवसा वीज वितरणावर मोठ्या प्रमाणात लोड येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

उकाड्यात झाली वाढ

तापमान व आद्रता वाढली असल्याने साहजिकच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असतो. त्यामुळे नागरिकांकडून फ्रीज, एसी, कुलर पंखे आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच दिवसा व रात्रीची मोठ्या प्रमाणात वीजेची मागणी वाढत असते. जिल्ह्यात उद्योग-धंदे नसले तरी घरगुती वापर, शेती क्षेत्रात होणारा विजेचा वापर बघता वीजेची मोठी मागणी आहे. नंदुरबार शहराचा विचार करता, नंदुरबारात नेहरु नगर, एकता नगर, पातोंडा येथील उपकेंद्राव्दारे साधारणत: सात ते आठ मेगावॅटचा वीजपुरवठा करण्यात येत असतो. नंदुरबार शहरात उन्हाळ्यात ७० लाख युनीटची मागणी असते़ तीच मागणी सामान्य दिवसांमध्ये ५० लाख युनिटपर्यंत जात असते. 

वीज पुरवठ्याची फ्रिक्वेंन्सी कमी-अधिक

उन्हाळा असल्याने वीजच्या मागणीत मोठी वाढ झालेली आहे. दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठ्यावर लोड पडत असल्याने वीज पुरवठ्याची फ्रिक्वेंन्सी कमी-अधिक होत आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारीदेखील नंदुरबारात कमी-अधिक दाबाचा वीजपुरवठा होत असल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. वीज पुरवठ्यावर पडणारा ताण लक्षात घेता अनेक वेळा अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याची समस्यादेखील जाणवत आहे. ग्रामीण भागात तर भर दिवसा वीज खंडित होत असल्याचे सांगण्यात आले आहे. आधीच उन्हाचे चटके त्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण होत आहेत.

 


Web Title: Additional requirement of 250 MW electricity for Nandurbar district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.