यंदापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 05:35 PM2019-07-02T17:35:37+5:302019-07-02T17:44:14+5:30

तब्बल २५ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांचे विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.

Student council elections in colleges this year | यंदापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुका

यंदापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुका

Next
ठळक मुद्दे२५ वर्षानंतर पुन्हा प्रक्रियाकुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांची माहिती

नांदेड: महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणुकीतून  अनेक नवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि विद्यार्थ्यांच्या गटातील वाढत्या भांडणतंट्यामुळे या निवडणुकाच बंद करण्यात आल्या होत्या. मात्र चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी परीषद निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तब्बल २५ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांचे विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभागृहामध्ये कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षणतज्ज्ञ आनंद माणूसकर (मुंबई), प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंघ बिसेन, कुलसचिव डॉ. आर.एम. मुलानी यांच्यासह परमेश्वर हासबे, ज्ञानोबा मुंडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार या निवडणुका घेण्यात येणार आहेत. याबाबत कुलगुरु डॉ. भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण असतात. या गुणाला संधी मिळावी या हेतूने वरील नव्या अधिनियमानुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुका पारदर्शी मोकळ्या वातावरणात आणि भयरहीत होण्यासाठी महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. डॉ. बिसेन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटावेत, याच हेतूने सदर निवडणुका घेण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांत सामाजिक जाणीवही निर्माण होईल. क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नवे नेतृत्वही या माध्यमातून उदयास येईल. या अनुषंगाने विद्यार्थी परीषदेची दर तीन महिन्याला बैठक होणार असून राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामधूनही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात येईल.

एक विद्यार्थी ५ पदासाठी करणार मतदान 
शिक्षणतज्ज्ञ माणूसकर यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली. सदर अधिनियम मागच्यावर्षी लागू झाला. मात्र उशीर झाल्यामुळे मागील वर्षी विद्यार्थी परीषदेच्या निवडणुका घेता आल्या नाहीत. त्या यावर्षी घेण्यात येणार आहेत. एका विद्यार्थ्याला पाच मतदान करण्याचा अधिकार राहणार असून, त्यामध्ये एक वर्ग प्रतिनिधी, दुसरा अध्यक्ष, तिसरा सचिव, चौथा महिला प्रतिनिधी आणि पाचवा मागासवर्गीय प्रतिनिधी असणार आहे. वर्ग प्रतिनिधी सोडून इतर चार पदे महाविद्यालयांतून निवडून द्यायची आहेत. त्यानंतर विद्यापीठस्तरावर पसंती क्रमाने या चार विद्यार्थी परिषद गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच यासाठी विद्यापीठातर्फे ३१ जुलैपर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेऊन विद्यापीठ विद्यार्थी परिषद स्थापन करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.
 

Web Title: Student council elections in colleges this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.