मनीषाच्या विवाहासाठी साईप्रसादचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:06 AM2019-04-27T01:06:30+5:302019-04-27T01:07:39+5:30

दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़

Saiprasad's initiative for Manisha's marriage | मनीषाच्या विवाहासाठी साईप्रसादचा पुढाकार

मनीषाच्या विवाहासाठी साईप्रसादचा पुढाकार

Next
ठळक मुद्देपित्याने केली होती आत्महत्या साईप्रसादच्या दात्यांनी दिले संसारोपयोगी साहित्य

नांदेड : दोन महिन्यांवर आलेल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मृत्यूला कवटाळलेल्या नानासाहेब भवर यांच्या कुटुंबियांची मदतीसाठी साईप्रसादने पुढाकार घेतला आहे़ भवर यांच्या मुलीच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी साईप्रसादच्या दात्यांनी घेतली असून लग्नासाठीचे सर्व साहित्य भवर कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहे़ साईप्रसादच्या या दातृत्वाचे हट्टा गावात कौतुक होत आहे़
वसमत तालुक्यातील हट्टा येथील शेतकरी नानासाहेब भवर यांनी मुलगी मनीषा हिची सोयरीक जुळविली होती़ ७ मे लग्नाची तारीखही ठरली होती़ परंतु सोयरीक झाल्यानंतर मनीषाच्या विवाहासाठी लागणारा खर्च कसा करायचा, या विवंचनेत ते होते़ भवर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच़ २० गुंठे जमीन असून भवर कुटुंब रोजमजुरी करुनच आपला उदरनिर्वाह चालवितात़
परंतु लग्नासाठीचा खर्च जुळविताना नानासाहेब भवर हतबल झाले होते़ त्याच विंवचनेत त्यांनी २८ एप्रिल रोजी आत्महत्या केली़ त्यामुळे अगोदरच संकटात असलेले भवर कुटुंब घरातील कर्तापुरुष गेल्याने अधिकच खचले होते़ भवर कुटुंबियावर कोसळलेल्या या संकटाची माहिती साईप्रसादच्या दात्यांना कळाली़
त्यांनी लगेच भवर कुटुंबियांशी संपर्क साधून मनीषाच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी उचलणार असल्याचे कळविले़ त्यानंतर साईप्रसादच्या दात्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले़ आठ दिवसांतच मनीषाच्या लग्नासाठी लागणारे सर्व साहित्य, वधू-वरांचे कपडे, मंगळसूत्र यासह संसारोपयोगी साहित्याचा साईप्रसादकडे ओघ सुरु झाला़ काही दिवसांत साईप्रसादकडे लग्नासाठी लागणारे सर्व साहित्य जमा झाले होते़ शुक्रवारी साईप्रसादने हे सर्व साहित्य भवर कुटुंबियाकडे सुपूर्द केले़ साईप्रसादच्या या दातृत्वामुळे भवर कुटुंबियांनी आनंदाश्रू गाळत मनोमन आभार मानले़
आत्महत्या करु नका, साईप्रसादशी संपर्क साधा
वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींच्या विवाहासाठी संकटात असलेल्यांनी साईप्रसादशी संपर्क साधावा़ साईप्रसाद अशा मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार आहे़ तसेच विवाहाच्या चिंतेमुळे आत्महत्या करु नका असे आवाहनही साईप्रसादने केले आहे़
आजपर्यंत साईप्रसादने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील अनेक मुलींचे विवाह लावून दिले आहेत़ त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच ६१ जोडप्यांचा विवाह सोहळाही घेण्यात आला होता़

Web Title: Saiprasad's initiative for Manisha's marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.