शेतकऱ्यांना सरसकट विमा द्या; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:54 PM2018-06-18T23:54:57+5:302018-06-18T23:54:57+5:30

जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असताना त्याला मदत करण्याऐवजी आणेवारी चुकीची दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. जिल्ह्यात सोयाबीनसह मूग, उडदाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. मात्र याच पिकांना पंतप्रधान पीक योजनेतून वगळल्याचे सांगत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही खा. चव्हाण यांनी दिला.

Provide comprehensive insurance to farmers; Otherwise the movement | शेतकऱ्यांना सरसकट विमा द्या; अन्यथा आंदोलन

शेतकऱ्यांना सरसकट विमा द्या; अन्यथा आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचा इशारा: शासनाने काढलेली आणेवारी चुकीची

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला असताना त्याला मदत करण्याऐवजी आणेवारी चुकीची दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला. जिल्ह्यात सोयाबीनसह मूग, उडदाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला आहे. मात्र याच पिकांना पंतप्रधान पीक योजनेतून वगळल्याचे सांगत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही खा. चव्हाण यांनी दिला.
सोमवारी सायंकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात विम्याचा हप्ता भरला आहे. हा हप्ता भरतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मागीलवर्षी सुरुवातीला अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांवर संकट आले. त्यानंतर पावसात मोठा खंड पडला. यामुळेही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे जिल्ह्यात नेमका किती पाऊस झाला? याचाच ताळेबंद शासनाकडे नाही.
अनेक ठिकाणची पर्जन्यमापक यंत्रे कार्यान्वित नाहीत. या तांत्रिक चुका, त्यात पिकांची आणेवारीही जास्तीची काढण्यात आली. या सर्व प्रकारांमुळेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी विम्यापासून वंचित राहिला. यास शासन-प्रशासनाचे निष्क्रिय धोरण कारणीभूत असल्याची टीका करीत पीकविमा कंपनीकडे असलेल्या अपुऱ्या मुनष्यबळाचाही फटका नुकसान भरपाई मिळण्यास झाल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. मात्र नेमके यातीलच काही पिकांना पंतप्रधान पीक योजनेतून वगळले. पर्यायाने याचाही फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे सांगत सरकारने वेळीच हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा. अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असे ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांना सोयाबीनची नुकसान भरपाई मिळालेली नाही. नांदेड तालुक्यातील २१ हजार ५३ शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा भरला होता. तर भोकरमध्ये १२ हजार ५३५, धर्माबाद ९ हजार २८१, मुदखेड १५ हजार ९१, मुखेड २१ हजार ५३, उमरी तालुक्यातील ९ हजार ९३१ शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा भरुनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी सांगत या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठविणार आहे. यातील कायदेशीर बाजूही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.
सेना-भाजप सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांकडे डोळेझाक केल्यानेच समस्या अधिक जटिल झाल्याचे सांगत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.
---
सरकारच्या खिसे भरण्याच्या धोरणामुळे भाडेवाढ
परिवहन महामंडळाने नुकतीच १८ टक्के भाडेवाढ केली आहे. एस.टी. तून प्रवास करणारा वर्ग सर्वसामान्य कष्टकरी आहे. या वर्गाला या भाडेवाढीमुळे मोठा फटका सोसावा लागत असल्याचे सांगत एकीकडे इंधनावर विविध कर लादायचे आणि त्या माध्यमातून खिसे भरण्याचे काम सरकार करीत आहे. दुसरीकडे एस.टी.ची भाडेवाढ करुन सर्वसामान्यांना दुहेरी फटका, इंधनावर सर्वाधिक व्हॅटही महाराष्टतच असल्याचे सांगत सरकारचे आर्थिक धोरण कोलमडल्याची टीका खा. अशोकराव चव्हाण यांनी केली. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद देशामध्ये जातीय तणाव निर्माण करीत आहे. ही बाब देशासाठी घातक असल्याचे आम्ही सांगत होतो. आज सरकारची सर्वोच्च यंत्रणाही याच पद्धतीचे अहवाल देत असून सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पहायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
---
समविचारी पक्षांना सोबत घेणार
भीमा-कोरेगाव प्रकरणातील भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई होत नाही. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात मागासवर्गीय समाजातील तरुणांना नग्न करुन मारहाण केली जाते. महाराष्टत हे काय सुरु आहे? येणाऱ्या काळात सरकारच्या या धोरणामुळे सामाजिक संघर्ष अधिक वाढण्याची चिंता व्यक्त करीत २०१९ च्या निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याचे खा.अशोक चव्हाण यांनी सांगितले.
शिवसेना, मनसे आणि एमआयएम या पक्षांना आमचा तात्त्विक विरोध आहे. मात्र भारिप, बसपा, शेकाप, जनता दल त्याबरोबरच खा. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष आणि रिपाइंचे कवाडे-गवई गट यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, हाच यामागे हेतू असल्याचे ते म्हणाले. सरकारला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखणे महाराष्टच्या हितासाठी आवश्यक असल्याचेही खा.अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: Provide comprehensive insurance to farmers; Otherwise the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.