अर्धापूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:25 AM2018-04-03T00:25:10+5:302018-04-03T00:42:50+5:30

अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे.

Permanent Water Supply Scheme for Ardapur City | अर्धापूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना

अर्धापूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना

googlenewsNext
ठळक मुद्देअशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश योजनेसाठी २५ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर; शहरवासियांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण व भोकरच्या आ.अमिता चव्हाण यांनी या योजनेसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता़
अर्धापूर शहरास सध्या जुन्या पाणी पुरवठा योजनेतून पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. परंतु पाण्याची असलेली उपलब्धता व शहराची वाढती लोकसंख्या यामुळे पाणीपुरवठ्यासाठी अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर खा. अशोकराव चव्हाण व आ़ अमिता चव्हाण यांनी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठीचा प्रारुप आराखडा प्रशासनास तयार करण्याच्या सूचना दिल्या. नगरपंचायत प्रशासनाने तयार केलेला प्रारुप आराखडा शासन स्तरावर प्रलंबित होता. यासाठी खा. अशोकराव चव्हाण व आ. अमिता चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन सुमारे २५.६१ कोटींची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली आहे. या योजनेअंतर्गत उर्ध्व पैनगंगेच्या डाव्या कालव्यातून शहरापासून ६ कि.मी. अंतर असलेल्या निमगाव तलावामध्ये पाण्याची साठवणूक करण्यात येईल व गरजेनुसार या पाण्याचा उपसा करण्यात येईल. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असली तरीही यावर्षी अर्धापूर शहरास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून खा़ चव्हाण यांनी १ एप्रिल रोजी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये २० टँकरद्वारे उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ बैठकीस भाऊराव साखर उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव तिडके, नगराध्यक्ष प्रतिनिधी सोनाजी सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पू बेग, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार अरविंद नर्सीकर, मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर आदींची उपस्थिती होती. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करणे व २० टँकरद्वारे उन्हाळ्यात शहरात पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाचे नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पू बेग व शहरातील नागरिकांनी स्वागत केले ़

मालमत्ताकर वाढीसही मिळविली स्थगिती
अर्धापूर नगरपंचायत प्रशासनाने वाढवलेल्या मालमत्ताकरास नागरिकांची मागणी लक्षात घेवून स्थगिती देण्यात आली आहे. अर्धापूर नगरपंचायत प्रशासनाने मागील काळात मालमत्ताकर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात शहरातील नागरिकांनी हा वाढीव कर रद्द करावा, अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण व आ. अमिता चव्हाण यांच्याकडे केली होती.नागरिकांच्या मागणीची दखल घेत खा.चव्हाण यांनी नगरपंचायतीने वाढविलेला मालमत्ताकर रद्द करावा अशा सूचना दिल्या होत्या. तसेच याबाबत बैठक घेण्याचे निर्देश दिले होते़त्यानंतर नगरपंचायतीची १५ मार्च रोजी सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये वाढविलेला मालमत्ताकर स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नगरपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे़

Web Title: Permanent Water Supply Scheme for Ardapur City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.