नांदेडचा पारा ४५ अंशांवर; उकाड्यामुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:55 AM2019-04-28T00:55:39+5:302019-04-28T00:56:15+5:30

गेल्या आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून त्यामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत़ शुक्रवारी एप्रिलच्या तापमानाचा उच्चांक मोडल्यानंतर

Nanded temperature crosses 45 degrees | नांदेडचा पारा ४५ अंशांवर; उकाड्यामुळे नागरिक हैराण

नांदेडचा पारा ४५ अंशांवर; उकाड्यामुळे नागरिक हैराण

Next

नांदेड : गेल्या आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून त्यामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत़ शुक्रवारी एप्रिलच्या तापमानाचा उच्चांक मोडल्यानंतर शनिवारी त्यामध्ये आणखी वाढ होत तापमान ४५ अंशांवर पोहोचले़ त्यामुळे दिवसभर घामाच्या धारा वाहत होत्या़
यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती़ फेब्रुवारी महिन्यात ३७ अंशांवर असलेले तापमान मार्च महिन्यात चाळिशीवर पोहोचले होते़ त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४१ अंश एवढे तापमान होते़ मागील आठवड्यात अवकाळी पावसामुळे नांदेडकरांना थोडा दिलासा मिळाला होता़ जवळपास सलग तीन दिवस तापमान ३७ अंशांवर होते़ परंतु, एप्रिलचा शेवटचा आठवडा सर्वांसाठीच तापदायक ठरत आहे़ २१ एप्रिलपासूनच नांदेडचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला होता़ शनिवारी एप्रिल महिन्यातील गेल्या पाच वर्षांचा ४४़२ अंशांचा रेकॉर्ड मोडत तापमान ४४़५ अंशांवर गेले होते़ तर शनिवारी त्यामध्ये आणखी वाढ होवून ते ४५ अंशांवर पोहोचले होते़ त्यामुळे नागरिक हैराण झाले होते़
दरम्यान, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ साधारणत: तीन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे़ त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून काळजी घ्यावी, उन्हाच्या वेळी घराबाहेर पडण्याचे सहसा टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़
रस्त्यांवर शुकशुकाट
वाढत्या तापमानामुळे नांदेडच्या मुख्य रस्त्यांवर सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शुकशुकाट दिसत होता. नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघत असताना अनेक ठिकाणी दुपारी विजेचा लपंडाव तर काही ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिक अजून त्रस्त झाले.

Web Title: Nanded temperature crosses 45 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.