"चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य"; नांदेड जिल्ह्यात फलक लावून पुढाऱ्यांना गावबंदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 06:36 PM2018-08-30T18:36:35+5:302018-08-30T18:38:38+5:30

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूकमोर्चा, ठोकमोर्चा, राज्य बंद अशा आंदोलनांनंतर आता पुढाऱ्यांना गावबंदचे अस्त्र उपसण्यात आले आहे.

"leaders will fired n parties will gone away, Maratha reservation is our only goal"; Plaintiffs in Nanded District, Pledge to the Speakers | "चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य"; नांदेड जिल्ह्यात फलक लावून पुढाऱ्यांना गावबंदी 

"चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य"; नांदेड जिल्ह्यात फलक लावून पुढाऱ्यांना गावबंदी 

नांदेड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूकमोर्चा, ठोकमोर्चा, राज्य बंद अशा आंदोलनांनंतर आता पुढाऱ्यांना गावबंदचे अस्त्र उपसण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सहा गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी करीत वेशीवर  ‘चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य’ असे फलक लावले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पुढाऱ्यांची गोची झाली आहे. 

मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन गेल्या काही महिन्यांत तीव्र झाले होते़ त्यासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या़ आत्महत्यांचे हे सत्र अद्यापही सुरुच आहे़ परंतु, अद्यापही समाजाला आरक्षण मिळाले नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या हदगाव तालुक्यातील रुई, उंचेगाव, महातळा, पेवा आणि धानोरा या पाच ग्रामपंचायतींनी सर्व ग्रामस्थांच्या संमतीने मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे़ पुढाऱ्यांनी आपली मानमर्यादा ओळखून गावात प्रवेश करावा, असा इशाराही या गावकऱ्यांनी दिला आहे. या प्रत्येक गावाच्या वेशीवर लावलेले फलक सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाले आहेत. तसेच राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारचा ठराव घेवून आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ या चार गावांनंतर नांदेड तालुक्यातील चिखली या गावीदेखील असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात सुरु झालेले हे लोण आता राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे़. 

दोन ग्रामपंचायतींनी घेतला ठराव 
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात पुढाऱ्यांना बंदी करण्याचा ठराव उंचेगाव आणि पेवा ग्रामपंचायतीने घेतला आहे.  पुढाऱ्यांनी आता विचार करुनच गावात पाऊल ठेवावे असा इशारा उंचेगावचे सरपंच पंजाबराव शिंदे यांनी दिला आहे़ पेवा येथे सरपंच अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात प्रवेश करू द्यायचा नाही, असा एकमताने ठराव घेण्यात आला़ ठरावाचे सूचक अनिल जाधव, तर अनुमोदन धनंजय जाधव यांनी दिले़  

चिखलीत तरूणांचा पुढाकार
गावातील तरुणांच्या पुढाकारातून गावात फलक लावण्यात आल्याची माहिती चिखलीतील प्रभाकर शेजुळे यांनी दिली़  

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार  
मराठा समाजाने आतापर्यंत आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले़ बंद पाळले़ परंतु, आरक्षण मिळाले नाही़ आता पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे़ पुढाऱ्यांनीही मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात पाय ठेवू नये. 
- अनिल कदम, कैलाश कदम, रूई, ता. हदगाव

Web Title: "leaders will fired n parties will gone away, Maratha reservation is our only goal"; Plaintiffs in Nanded District, Pledge to the Speakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.