‘कोल्हापूर-मुंबई’ विमान प्रवास अडीच हजारांत

By Admin | Published: March 31, 2017 12:48 AM2017-03-31T00:48:15+5:302017-03-31T00:48:15+5:30

लवकरच ‘टेक आॅफ’ : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत समावेश; राज्यातील पाच शहरांचा समावेश

KOLHAPUR-MUMBAI AIRCRAFT TRAINS | ‘कोल्हापूर-मुंबई’ विमान प्रवास अडीच हजारांत

‘कोल्हापूर-मुंबई’ विमान प्रवास अडीच हजारांत

googlenewsNext

कोल्हापूर : विमान उड्डाण परवान्याचे नूतनीकरण, धावपट्टीची दुरुस्ती, आदी कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमान सेवा पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. त्यामुळे ‘कोल्हापूर-मुंबई’ प्रवास अडीच हजार रुपयांत करता येणार आहे. सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होणार आहे.
सामान्य नागरिकांना विमान प्रवास शक्य व्हावा तसेच छोटी शहरे विमान सेवेने जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना ‘उडान’मध्ये महाराष्ट्रामधील पाच शहरांचा समावेश केला आहे. त्यामध्ये कोल्हापूर, नांदेड, नाशिक, जळगाव आणि सोलापूर ही शहरे समाविष्ट केली असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी जाहीर केला.
योजनेअंतर्गत देशातील ४५ मार्गांचा समावेश असून, एक तासापर्यंतचा विमान प्रवास करता येणार आहे. जे प्रवासी तिकीट आरक्षित करतील अथवा प्रथम येतील त्यांना अडीच हजार रुपयांच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. संबंधित सेवा पुरविणाऱ्या विमानातील एकूण जागांपैकी अर्ध्या जागा अडीच हजार रुपयांसाठीच्या असणार आहेत.
एअर डेक्कन लाईन्सची ही हवाई विमान सेवा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. धावपट्टीची दुरुस्ती, विमान कंपन्यांचा नकार, विमान उड्डाण परवान्याचे नूतनीकरण, आदी कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमान सेवा पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने सरकारकडून सकारात्मक पाऊल पडले आहे. (प्रतिनिधी)


पासपोर्ट केंद्रापाठोपाठ आता कोल्हापूरच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विमान सेवा प्रारंभाबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. याबद्दल सरकारला कोल्हापूरकरांच्यावतीने धन्यवाद देतो. ‘उडान’मधील सहभागामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. शिवाय अडीच हजार रुपये तिकीट दर राहणार असल्याने ते सर्वसामान्यांना परवडणार आहे. पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरू होण्यासाठीचा २७० कोटींचा आराखडा सादर केला असून, तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. विमान सेवा प्रारंभाच्या अनुषंगाने मी केलेला पाठपुरावा यशदायी ठरल्याचे समाधान वाटत आहे.
- धनंजय महाडिक, खासदार

कोल्हापूरच्या विमान सेवेचा ‘उडान’मध्ये समावेश केल्याने आता लवकरच विमान सेवा सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कोल्हापूरकरांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी आता पूर्ण होणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी ही विमान सेवा सुरू होणे आवश्यक होते. तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ही सेवा येत्या काही महिन्यांत सुरू होऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात होईल.
-चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी असलेली ‘उडान योजना’ गुरुवारी सुरू झाली असून, त्यात कोल्हापूरचा समावेश झाला आहे. याबाबत केंद्र आणि सरकारकडील माझ्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. येथील विमानसेवा सुरू झाल्याने कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, गुंतवणूक वाढणार आहे. ‘उडान’मधील कोल्हापूरच्या समावेशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू, जयंत सिन्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. - संभाजीराजे , खासदार


विमानतळाबाबत सरकारची तीन वर्षांतील पावले
लो-कॉस्ट विमानतळामध्ये कोल्हापूरचा सहभाग (जुलै २०१४)
विमानतळ विकासासाठी केंद्राकडून २५० कोटींची तत्त्वत: तरतूद (नोव्हेंबर २०१४)
राज्य सरकारकडून विकास आराखड्याच्या निधीपैकी २० टक्के रक्कम देण्याची तयारी (आॅक्टोबर २०१६)

विमान सेवा बंद असलेल्या कोल्हापुरातील पर्यटन, उद्योग, आदी क्षेत्रांचा विकास काहीसा ठप्प झाला आहे. मात्र, ‘उडान’ योजनेद्वारे कोल्हापुरातून विमान सेवा सुरू होण्याचा चांगला निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने येथील विकासाला चालना मिळेल. अडीच हजार रुपयांत विमान प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळेल.
- बी. व्ही. वराडे, पर्यटन तज्ज्ञ

Web Title: KOLHAPUR-MUMBAI AIRCRAFT TRAINS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.