कंधार तालुक्यातील सव्वाशे अंगणवाड्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:21 AM2019-06-04T00:21:44+5:302019-06-04T00:22:30+5:30

शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़

hundreds anganwadis in Kandhar taluka are dangerous | कंधार तालुक्यातील सव्वाशे अंगणवाड्या धोकादायक

कंधार तालुक्यातील सव्वाशे अंगणवाड्या धोकादायक

Next
ठळक मुद्देसहा अंगणवाड्यांत उघड्यावरच गिरवावे लागतात चिमुकल्यांना धडे

नांदेड : शासनाकडून प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येतात़ परंतु, प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच करण्यात येत नाही़ त्यात प्राथमिक शिक्षणात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाड्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे़ एकट्या कंधार तालुक्यात तब्बल सव्वाशे अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत़ त्यामुळे येत्या पावसाळ्यात या इमारतींची अवस्था आणखी बिकट होणार आहे़
कंधार तालुक्यात अंगणवाडी व मिनी अंगणवाडीची एकूण संख्या ३२० आहे. परंतु, अनेक अंगणवाडीला स्वत:ची इमारत नाही. सव्वाशेपेक्षा अधिक अंगणवाडीला इमारत असली तरी त्या नादुरूस्त आहेत. शाळेच्या खोल्या, अंगणवाडी व्हरांडा, ग्रामपंचायत, समाजमंदिर, भाड्याच्या इमारतीत त्या भरतात. त्यातच सहा अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य, आहार आदी सोयी-सुविधा देऊन देशाची भावी पिढी कार्यक्षम करण्याकरिता अंगणवाडी केंद्राचे मोठे योगदान आहे. परंतु, अद्याप तालुका कुपोषणमुक्त होऊ शकला नाही, अंगणवाडीचे रूप पालटले नाही, अंगणवाड्या हायटेक होत नाहीत. त्यामुळे बालकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच खेळाचे साहित्य नाही, संरक्षक भिंत नाही, शुद्ध पाणी नाही, विद्युत पुरवठा नाही. अशा समस्यांचा सामना करीतच विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत़
स्वत:ची इमारत असलेल्या अंगणवाडीची संख्या फक्त १७५ असून यातील १२५ पेक्षा अधिक इमारती या नादुरूस्त असल्याचे पुढे आले आहे़ सुमारे ३५ अंगणवाड्या या भाड्याच्या इमारतीत आहेत. शाळेच्या कक्ष व व्हरांड्यात सुमारे ५० अंगणवाड्या भरतात. ग्रामपंचायतीत १७, व्हरांड्यात ७, समाजमंदिरात २३, कार्यकर्तीच्या घरी २ अशाप्रकारे मिळेल तिथे अंगणवाडी सुरु करुन विद्यार्थ्यांना धडे गिरवावे लागत आहेत़
त्यात उघड्यावर ६ अंगणवाड्या भरत असल्याचे समोर आले आहे. त्यात बाळांतवाडी तांडा अंगणवाडी, नवरंगपुरा क्रमांक २, जांभूळवाडी, रूईतांडा, सावरगावतांडा, रेखातांडा मिनी अंगणवाडीचा समावेश आहे. उघड्यावरील अंगणवाडीत ऊन, वारा, पावसात बालकांना बसावे लागते़ पाऊस किंवा उनाचा पारा वाढला की त्या दिवशी अंगणवाडीला सुटी असे समीकरणच बनले आहे़ यासाठी प्रयत्नाची गरज असून वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची मागणी होत आहे. अंगणवाडी केंद्रात पायाभूत सुविधा मिळत नाहीत, कुपोषणमुक्ती होत नाही. मग कार्यक्षम भावी पिढी व सुदृढ बालक कसे होतील? हा खरा प्रश्न आहे.
आदर्श अंगणवाडी केंद्रात ३२ अंगणवाड्यांचे रूपांतर करण्यासाठी मंजुरी अद्याप मिळाली नाही़ आय.एस.ओ. अंगणवाडीचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. अशा विविध अडचणींचा सामना अंगणवाड्या करीत आहेत. त्यात मात्र हजारो बालकांची फरफट होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ जिल्हा परिषदेकडून या अंगणवाड्यांसाठी भरीव निधीची तरतूद करुन या इमारती पुन्हा उभाराव्या लागणार आहेत़
पावसाळ्यात होवू शकते दुर्घटना
कंधार तालुक्यातील जवळपास सव्वाशे अंगणवाड्यांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत़ अनेक ठिकाणी इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत़ तर काही ठिकाणी छताचा भागही कोसळल्याचे दिसून आले आहे़
तर अनेक अंगणवाड्यांची छप्परे गळकी आहेत़ त्यामुळे येत्या पावसाळ्यात या भिंतीमध्ये पाणी मुरुन त्या पडण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़
पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य, आहार आदी सोयीसुविधा देऊन देशाची भावी पिढी कार्यक्षम करण्याकरिता अंगणवाडी केंद्राचे मोठे योगदान आहे. परंतु तालुका अद्याप कुपोषणमुक्त होऊ शकला नाही, अंगणवाडीचे रूप पालटले नाही, अंगणवाड्या हायटेक होत नाहीत.

Web Title: hundreds anganwadis in Kandhar taluka are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.