पालकमंत्र्यांना कामे बदलाचा अधिकार नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:53 AM2018-05-17T00:53:10+5:302018-05-17T00:53:10+5:30

दलितवस्ती निधीअंतर्गत महापालिकेने सुचवलेली कामे रद्द का केली? याबाबत कोणताही खुलासा न करता नवी कामे पालकमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात सुचवली आहेत, असा सवाल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांना कामे बदलण्याचे अधिकारच नाहीत, हे स्पष्ट करताना महापालिकेने पाठविलेली कामेच दलितवस्ती निधीतून करावेत, असा ठरावही करण्यात आला.

Guardian minister does not have the right to change the works | पालकमंत्र्यांना कामे बदलाचा अधिकार नाहीच

पालकमंत्र्यांना कामे बदलाचा अधिकार नाहीच

Next
ठळक मुद्देनांदेड महापालिकेच्या सभेत निषेध : २१ मे रोजीच्या दौऱ्यात घेराव घालण्याचा इशारा, गुत्तेदारांच्या संबंधातून नवीन कामे !

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दलितवस्ती निधीअंतर्गत महापालिकेने सुचवलेली कामे रद्द का केली? याबाबत कोणताही खुलासा न करता नवी कामे पालकमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात सुचवली आहेत, असा सवाल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांना कामे बदलण्याचे अधिकारच नाहीत, हे स्पष्ट करताना महापालिकेने पाठविलेली कामेच दलितवस्ती निधीतून करावेत, असा ठरावही करण्यात आला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी ११ वाजता महापौर शीलाताई भवरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत प्रारंभी महापालिकेचे सहायक आयुक्त एल. के. चौरे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शहरातील विविध समस्यांवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील पाणीप्रश्न, अर्धवट कामे याबाबत विचारणा करण्यात आली.
महापालिकेने दलितवस्ती निधी अंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी १५ कोटी ६६ लाखांच्या निधीतून ६४ कामांचे प्रस्ताव मंजूर केले होते. हे प्रस्ताव मान्यतेसाठी पालकमंत्र्यांकडे पाठविण्यात आले. मात्र पालकमंत्र्यांनी ६४ पैकी १७ कामे रद्द करत नवी २० कामे सुचवली. ही कामे सुचवण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना नाहीतच, असा पवित्रा उपमहापौर विनय गिरडे, सभापती शमीम अब्दुल्ला, माजी महापौर अब्दुल सत्तार आदींनी घेतला. त्यातच भाजपाच्या नगरसेविका गुरप्रितकौर सोडी, दीपक रावत, बेबीताई गुपिले या भाजपा नगरसेवकांनीही पालकमंत्र्यांच्या निर्णयास विरोध केला तर गुरप्रितकौर सोडी यांनी पालकमंत्र्यांचा थेट निषेध व्यक्त केला.
सभागृहात काँग्रेससह भाजपानेही पालकमंत्री रामदास कदम यांचा दलितवस्ती विषयात निषेध केला. मात्र यावेळी शिवसेनेचे एकमेव सदस्य बालाजी कल्याणकर हे सभागृहात पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे समर्थन करीत होते. पालकमंत्र्यांनी सुचवलेली कामे शहरासाठी आवश्यक असल्याचेही कल्याणकर म्हणाले. या विषयात महापौरांनी खुलासा करण्याची मागणी लावून धरली होती.
सभापती शमीम अब्दुल्ला यांनी पालकमंत्र्यांना शहराचा विकास करायचा असेल तर दुसरा १०० कोटींचा निधी आणून कामे करावीत, असा सल्लाही दिला. तर उमेश चव्हाण यांनी महापालिकेच्याच यादीला मंजुरी द्यावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. २१ मे रोजी पालकमंत्री नांदेडमध्ये येत आहेत. त्यांना यावेळी दलितवस्ती निधीवरुन घेराओ घालण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पाणीप्रश्नावर बापुराव गजभारे, ज्योत्स्ना गोडबोले, सतीश देशमुख, मुळे आदींनी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांना धारेवर धरले तर उमेश चव्हाण यांनीही दिवाबत्ती विभागाकडून दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. त्यात अंधारे हे नगरसेवकांचे फोनही घेत नसल्याचे गजभारे यांनी सांगितले.
सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनीही पाणीपुरवठा तसेच मलनि:सारण विभागाच्या देखभाल दुरुस्तीचे कामे रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही कामेही त्वरित सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बीएसएनएलच्या दोन मोबाईल टॉवरसाठी जागा भाडेपट्टीवर देण्याचा विषय सभागृहापुढे होता. या ठरावास सभागृहाने विरोध दर्शविला.

उपायुक्त रत्नाकर वाघमारे होणार स्वेच्छानिवृत्त
महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या ठरावालाही सभागृहात बुधवारी झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. वाघमारे यांच्या कार्यकाळाबद्दल सभागृहात कौतुक करण्यात आले. सभागृहनेते गाडीवाले यांनी वाघमारे यांनी शहर विकासाचा आराखडा तयार केल्याचे सांगितले. त्यांच्याच काळात गुरू-त्ता-गद्दीची कामे पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले. सभापती शमीम अब्दुल्ला यांनीही वाघमारे यांचा नगरपालिका ते महापालिकेचा प्रवास शहराच्या विकासासाठी उपयुक्त राहिल्याचे सांगितले. दीपक रावत यांनी वाघमारे यांच्या कार्याचे कौतुक केले. याच सभेत महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे यांनाही एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, असा ठराव पास केला. विशेष म्हणजे, नगरसेवकांनी हा ठराव आणला होता.
बुद्धमूर्तीचा ठराव
भीमघाट येथे गोदावरी नदीपात्रात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती उभारावी, या ठरावासही सभागृहात मंजुरी देण्यात आली. बापूराव गजभारे यांनी हा ठराव ठेवला होता. गोदावरी पात्रात गौतम बुद्धांची मूर्ती उभारल्यास पर्यटनाच्या दृष्टीने नांदेडचे महत्त्व वाढणार आहे. त्यादृष्टीने मनपाने पाऊले उचलावेत, असे गजभारे यांनी सभागृहात सांगितले. एकमताने हा ठराव मंजूर झाला.

भाजीपाला मार्केटसाठी पर्याय काढू-आयुक्त
विमानतळ परिसरातील म्हाळजा येथील फळे व भाजीपाला मार्केट महापालिकेने हटवले आहे. या विषयावरही सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले. या व्यापाºयांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करीत आहे, असा सवाल साबेर चाऊस ,अ. हाफीज आदींनी उपस्थित केला तर माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी महापालिकेच्या अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे. जुन्या नांदेडातील फळेबाजार येथेही अतिक्रमण झाले असताना महापालिकेने आपल्या जागेवरील अतिक्रमण न काढता इतर ठिकाणचे अतिक्रमण काढले आहे. महापालिकेने स्वत:च्या जागेवर अतिक्रमण काढावे, अशी मागणीही केली आहे. या प्रश्नावर आयुक्त लहुराज माळी यांनी यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Guardian minister does not have the right to change the works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.