गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:39 AM2019-01-16T01:39:28+5:302019-01-16T01:39:47+5:30

ग्रामपंचायत अधिनियमानुसार विहीत मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याने उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अपात्र घोषित केले आहे.

Five members, including Sarpanch of Golgaon, will be suspended | गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द

गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द

googlenewsNext

उमरी : ग्रामपंचायत अधिनियमानुसार विहीत मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याने उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील सरपंचासह पाच सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अपात्र घोषित केले आहे.
सरपंच देवीदास गंगाराम मुंडफळे, राजेंद्र गंगाराम कांबळे, राजाबाई यशवंत कांबळे, निर्मला अशोक कचकलवाड, रूक्मिणबाई कोमाजी सुरणे या पाच जणांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्दबातल ठरविले आहे.
याप्रकरणी पिराजी व्यंकटी जरपटवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे अ‍ॅड. एस. के. पुजारी यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती. वरील पाच सदस्यांनी जुलै २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत जात पडताळणी समितीने दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीच्या उर्वरित कालावधीकरिता सदस्यपदावरून अपात्र घोषित करण्यात यावे, यासाठी विवाद अर्ज दाखल केला होता.
या अर्जाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम (१०) १ (अ) नुसार निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे मानण्यात येईल आणि ते सदस्यपदी राहण्यास अपात्र राहतील, अशी अधिनियमात तरतूद आहे.
या प्रकरणातील वादी पिराजी जरपटवाड यांचा अर्ज मंजूर करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला की , देवीदास मुंडफळे, राजेंद्र कांबळे, राजाबाई कांबळे, निर्मला कचकलवाड व रूक्मीणबाई कोमाजी सुरणे या पाच जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व उर्वरित कालावधीसाठी अनर्ह ठरविण्यात आले.

Web Title: Five members, including Sarpanch of Golgaon, will be suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.