प्रसूतीदरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणी नांदेडमधील सात डॉक्टरांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:01 PM2018-01-30T14:01:29+5:302018-01-30T14:03:47+5:30

प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने वजिराबाद पोलिसांनी शहरातील सात खाजगी डॉक्टरांवर गुन्हा नोंदविला आहे़

Court orders against seven doctors in Nanded in case of woman's death during pregnancy | प्रसूतीदरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणी नांदेडमधील सात डॉक्टरांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

प्रसूतीदरम्यान महिलेच्या मृत्यू प्रकरणी नांदेडमधील सात डॉक्टरांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देकेंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान सुहास अशोक ढोले यांनी त्यांची पत्नी विजया यांना २६ जुलै २०१६ रोजी प्रसूतीसाठी नांदेडातील बिडवई नर्सिंग होम येथे दाखल केले होते़यावेळी डॉक्टरांनी सुहास ढोले यांना विजया यांची सिझेरियन करावी लागेल असे सांगितले़ त्यांच्यावर सिझेरियन करण्यात आले़ परंतु शस्त्रक्रियेनंतर २८ जुलै रोजी विजया यांचा मृत्यू झाला़

नांदेड : प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान एका महिलेचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने वजिराबाद पोलिसांनी शहरातील सात खाजगी डॉक्टरांवर गुन्हा नोंदविला आहे़ दीड वर्षांपूर्वी बिडवई नर्सिंग होममध्ये ही घटना घडली होती़ 

मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान सुहास अशोक ढोले यांनी त्यांची पत्नी विजया यांना २६ जुलै २०१६ रोजी प्रसूतीसाठी नांदेडातील बिडवई नर्सिंग होम येथे दाखल केले होते़ यावेळी डॉक्टरांनी सुहास ढोले यांना विजया यांची सिझेरियन करावी लागेल असे सांगितले़ त्यानंतर त्यांच्यावर सिझेरियन करण्यात आले़ परंतु शस्त्रक्रियेनंतर २८ जुलै रोजी विजया यांचा मृत्यू झाला़ आपल्या पत्नीचा मृत्यू डॉक्टरांच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करीत सुहास ढोले यांनी त्यावेळी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ तसेच संबंधित डॉक्टरवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती़, परंतु पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही़ त्यानंतर सुहास ढोले यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली़ 

या प्रकरणात सुनावणी होवून प्रथम वर्ग न्या़ तिसरे यांनी नर्सिंग होमच्या सात डॉक्टरांवर कलम ३०४ (३४) नुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश वजिराबाद पोलिसांना दिले. या आदेशात न्यायालयाने विजया यांचे सिझेरियन पैसे उकळण्यासाठी करण्यात आले असून डॉक्टरांच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. यानंतर डॉ़ नंदकुमार बिडवई, डॉ़ सचिन एऩ बिडवई, डॉ़उमेश भालेराव, डॉ़प्रांजली जोशी, डॉ़ डी़ ए़ वाघमारे, डॉ़ राजेश तगडपल्लेवार आणि डॉ़ अरुण कट्टे या सात डॉक्टरांच्या विरोधात वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सपोनि सुनील बडे हे करत आहेत़ 

Web Title: Court orders against seven doctors in Nanded in case of woman's death during pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.