नांदेड जिल्ह्यात ५५ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:54 AM2018-07-02T00:54:02+5:302018-07-02T00:54:33+5:30

मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आजपर्यंत पेरण्या आटोपल्या. मृग नक्षत्रानंतर पावसाने दहा ते बारा दिवसांची उघडीप दिल्यानंतर पेरणी रखडली होती. त्यानंतर मागील आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येवून आजपर्यंत जवळपास ५४.९१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

55% sowing in Nanded district | नांदेड जिल्ह्यात ५५ टक्के पेरणी

नांदेड जिल्ह्यात ५५ टक्के पेरणी

Next
ठळक मुद्देमोठ्या पावसाची अपेक्षा : सर्वाधिक ८३.७० टक्के सोयाबीनची पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आजपर्यंत पेरण्या आटोपल्या. मृग नक्षत्रानंतर पावसाने दहा ते बारा दिवसांची उघडीप दिल्यानंतर पेरणी रखडली होती. त्यानंतर मागील आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येवून आजपर्यंत जवळपास ५४.९१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर खरीपपूर्व मशागतीची कामे वेळेत आटोपली. यापाठोपाठ मृग नक्षत्राचा पाऊसही मुबलक प्रमाणात पडला. त्यामुळे मृगात पेरणीला सुरूवात झाली. सोयाबीन पेरणीसह कापूस आणि हळद लागवडीवर जिल्ह्यातील शेतकºयांनी भर दिला. दरम्यान, दहा ते बारा दिवस पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शेतक-यांची तारांबळ उडाली. नुकतेच उगवलेल्या पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यातच २२ जूननंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले.
मागील आठवडाभरात झालेल्या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकºयांनी पेरण्या उरकून घेतल्या. जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ४२ हजार २६९ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार ४७२ हेक्टर असून त्यापैकी जवळपास साडेचार लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ८३.७० टक्के सोयाबीनची पेरणी आहे तर कापसाचे ३ लाख २३ हजार ७५४ सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी २ लाख २ हजार ६५५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.
आंतरपीक म्हणून घेतल्या जाणाºया कडधान्याची ३६ टक्के पेरणी झाली आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६९ हजार ८९८ हेक्टर असून त्यापैकी ३२ हजार ९४७ हेक्टरवर तर मूग- सर्वसाधारण क्षेत्र २९ हजार ९६४ हेक्टरपैकी १० हजार ६१० हेक्टर तर उडदाच्या सर्वसाधारण ५० हजार ३४२ हेक्टरपैकी १२ हजार ८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
---
नांदेड : हदगाव तालुक्यात सर्वाधिक पेरणी
हदगाव तालुक्यात सर्वाधिक ९१.९९ टक्के तर सर्वात कमी लोहा तालुक्यात १५.३३ टक्के पेरणी झाली़ तसेच नांदेडमध्ये २९ हजार २५ हेक्टरपैकी १६ हजार १९३ हेक्टरवर, अर्धापूर - १८ हजार ४०४ पैकी १४ हजार ८०२ हेक्टरवर, मुदखेड- १७ हजार ८२१ पैकी ८ हजार ५०६, लोहा- ८६ हजार २८५ पैकी १३ हजार २२४, कंधार- ६४ हजार ५६८ पैकी ४५ हजार ३४, देगलूर- ४४ हजार ८२४ पैकी १० हजार ७३९, मुखेड- ७६ हजार ७१७ पैकी ३७ हजार ८५६, नायगाव- ४७ हजार ५३७ पैकी ७ हजार ९७०, बिलोली- ३२ हजार ७०२ पैकी २७ हजार ६०२, धर्माबाद ३० हजार ५५९ पैकी २२ हजार ८४५, किनवट- ८ हजार २३२ पैकी ५ हजार ४३७, हदगाव- ८ हजार २४५ पैकी ७ हजार ५८५ हेक्टरवर तर हिमायतनगर- ८४.५६ टक्के, भोकर- ३८.६३ टक्के, उमरी- ६४.५२ तर माहूर तालुक्यात ५२.३५ टक्के पेरणी झाली आहे.
---
यंदा सोयाबीनचा पेरा वाढणार
जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९९ हजार ८९ हेक्टर असून त्यापैकी १ लाख ६६ हजार ६३६ हेक्टर म्हणजेच ८३.७० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी बिलोली तालुक्यात सर्वाधिक ४६२.५२ टक्के सोयाबीनची पेरणी झाली़
बिलोलीत सर्वसाधारण क्षेत्र ३ हजार ६६ हेक्टर गृहीत धरलेले असताना १४ हजार १८१ हेक्टरवर पेरणी झाली़ तर हदगावमध्ये ४३ हजार २१३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. नांदेड तालुक्यात सोयाबीनची १० हजार १११ हेक्टर, अर्धापूर- ११ हजार ५४३, मुदखेड- ४ हजार ५८६, लोहा- १ हजार १६३, कंधार- १२ हजार ४३०, देगलूर- ३ हजार ७८४, मुखेड- १६ हजार ८००, नायगाव- २ हजार १९० हेक्टर, धर्माबाद- १० हजार २५४, किनवट- ७ हजार ३६६, माहूर- ७ हजार ८६४, हिमायतनगर- १० हजार ७५०, भोकर- २ हजार ७२१ तर उमरी तालुक्यात ७ हजार ६८० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

Web Title: 55% sowing in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.