हदगाव येथे रोपवाटिकेवर मजूर ३ मात्र,  मस्टरवर नोंद ३० जणांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 08:23 PM2018-04-12T20:23:03+5:302018-04-12T20:23:03+5:30

हदगाव सामाजिक वनीकरण विभागाच्या तालुक्यात चार रोपवाटिका असून प्रत्येक रोपवाटिकेवर उपस्थित मजुरांची संख्या केवळ तीन आहे़ तथापि बिल काढण्याच्या मस्टरवर मात्र हीच संख्या ३० असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़

3 laborers at Ropewater in Hadgaon, but 30 people on Muster's list | हदगाव येथे रोपवाटिकेवर मजूर ३ मात्र,  मस्टरवर नोंद ३० जणांची

हदगाव येथे रोपवाटिकेवर मजूर ३ मात्र,  मस्टरवर नोंद ३० जणांची

googlenewsNext

- सुनील चौरे

हदगाव ( नांदेड ) : हदगाव सामाजिक वनीकरण विभागाच्या तालुक्यात चार रोपवाटिका असून प्रत्येक रोपवाटिकेवर उपस्थित मजुरांची संख्या केवळ तीन आहे़ तथापि बिल काढण्याच्या मस्टरवर मात्र हीच संख्या ३० असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ २७ मजूर गेले कुठे, असा सवाल केला जात आहे़ 

तालुक्यातील केदारगुडा, निवघा, रुई, येवली येथे रोपवाटिका आहे़ रुई येथील रोपवाटिका एका शेतकऱ्याच्या शेतात भाड्याने तर त्याच शेतकऱ्याच्या हदगाव येथील घरात विभागाचे कार्यालय आहे़ या रोपवाटिकेला पाण्याची व्यवस्था नाही़ केदारगुडा, निवघा, रुई येथे रोपे जोपासणे एवढेही पाणी नसताना रोपवाटिका स्थापन करण्याचे कारण काय? असा सवाल शेतकऱ्यांचा आहे़ रुई, केदारगुडा येथे २५ हजार तर येवली व निवघ्यात ५० हजार रोपे निर्माण करण्याचे उद्दिष्ट असताना तेथे केवळ मोठ्या ६०० पिशव्या तयार होतात़ शासन नियमाप्रमाणे एका रोपासाठी ८ रुपये खर्च येतो़ या रोपांना पाणी देण्यासाठी मजुरांची गरज असते़  प्रत्येक रोपवाटिकेच्या मस्टरवर मजुरांची संख्या ३० आहे़ प्रत्यक्षात मात्र केवळ तीन मजूर उपस्थित आहेत़ हदगाव येथील एका आरटीआय कार्यकर्त्याने रुईच्या रोपवाटिकेची माहिती घेऊन स्पॉट पंचनामा करण्याची विनंती तहसीलदारांना केली़ त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ नंतर मात्र हे प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा आहे़ 

सप्टेंबर ते मे या ९ महिन्यांच्या दरम्यान रोप लागवडीचे काम असते़ त्यानंतर जून-जुलैमध्ये लागवड होते़ प्रत्यक्षात यात दोन ते तीन हजार रोपे असावयास पाहिजे़ मात्र तसे नाही. रुई रोपवाटिकेवर बुधवारी शंकर अमृता हाके, गोदावरी शंकर हाके, सविता रामकिशन हाके हे तीनच मजूर उपस्थित होते़ छोट्या पिशवीतील रोपे काढून मोठ्या पिशवीत  भरण्याचे काम  करीत होते़ गंगाराम मुळे यांच्याकडे रोपवाटिकेची देखभाल करण्याची जबाबदारी आहे़ 

सामाजिक वनीकरण विभागाला वनविभागाप्रमाणे वृक्ष संरक्षण, प्राणी संरक्षण, हल्ले, शेती नुकसान अशी कोणतीही कामे नाहीत़ केवळ रोप तयार करणे, रस्त्यालगत लावणे, त्यांचे संगोपन करणे एवढेच काम आहे़ तेही व्यवस्थित होत नाही़ जिथे पाणी नाही, विहीर खोदली तरीही ती ढासळते, अशा ठिकाणी रोपवाटिका तयार करण्याचे काम घेण्यात आले़ त्यामागचे कारण मात्र कळू शकले नाही़ पाण्याच्या ठिकाणीच रोपे लावली पाहिजेत, असा नियम आहे़ 

रुईच्या रोपवाटिकेला ४०० मीटरवरून वीज कनेक्शन घेण्यात आले़ येथील रोपांना सावली नाही़ पाण्याची व्यवस्था नाही, रात्री वॉचमन नाही़ येथे सामाजिक वनीकरण अधिकारी म्हणून एस़एच़ मोतेवार कार्यरत आहेत़ यापूर्वी त्यांच्यावर वाळकी येथे असताना खोटे मजूर दाखवून मजुरी उचलल्या प्रकरणी गुन्हाही नोंद करण्यात आला होता़ सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे़ मनाठा पाटी, सावरगाव मार्गे बारड-गडगा हा बायपास रोड जाणार आहे, हे माहीत असतानाही या रस्त्यालगत खड्डे खोदण्यात आले़ उद्या लावलेली रोपे, त्यासाठीचा खर्च वाया जाणार हे माहीत असतानाही खड्डे खोदण्याचे कारण काय, असा सवाल आहे़ 

मजूर सतत बदलत असतात 
एक मजूर सतत कामावर राहत नाही, त्यामुळे मध्येच दुसरा घ्यावा लागतो. परिणामी मजुरांची संख्या जास्त दिसते.
- एस.एच.मोतेवार, सामजिक वनीकरण अधिकारी, हदगाव 

Web Title: 3 laborers at Ropewater in Hadgaon, but 30 people on Muster's list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.