जागतिक योग दिन; गुप्ता दाम्पत्याचा सातासमुद्रापार ‘योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:14 AM2018-06-21T11:14:50+5:302018-06-21T11:15:00+5:30

अमेरिकेत राहणाऱ्या मुलाला भेटायला एकदा नागपूरचे दाम्पत्य गेले. तेथे मुलाच्या ओळखीने मिळेल त्याला नि:शुल्क योगाचे मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी सुरू केले.

World Yoga Day; Across the seven seas Gupta couple teaches Yoga | जागतिक योग दिन; गुप्ता दाम्पत्याचा सातासमुद्रापार ‘योग’

जागतिक योग दिन; गुप्ता दाम्पत्याचा सातासमुद्रापार ‘योग’

Next
ठळक मुद्देभरत गुप्ता यांना अमेरिकेचा योगाचार्य अवॉर्डनागपूरच्या सन्मानात भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिकेत राहणाऱ्या मुलाला भेटायला एकदा नागपूरचे दाम्पत्य गेले. तेथे मुलाच्या ओळखीने मिळेल त्याला नि:शुल्क योगाचे मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी सुरू केले. अमेरिकनांनाही त्यांच्याकडून योग शिकण्याची उत्सुकता. पाहता पाहता हे दाम्पत्य तेथे लोकप्रिय झाले आणि विविध संस्थांकडून त्यांना योग शिकविण्याचे आमंत्रण येऊ लागले. आॅस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या मुलाकडेही त्यांचा हाच नित्यक्रम. या दाम्पत्यापैकी डॉ. भरत गुप्ता यांना अमेरिकेच्या संस्थेने योगाचार्य हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. नागपूरच्या दाम्पत्याचा योग मार्गदर्शनाचा हा ग्लोबल प्रवास थक्क करणाराच आहे.
डॉ. भरत गुप्ता व त्यांच्या पत्नी सरोज यांचे योग प्रचाराचे ध्येय सर्वांना प्रेरणा देणारेच आहे. डॉ. गुप्ता हे चंद्रपूरला स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (सेल) येथून सेवानिवृत्त झालेले मेटालर्जिकल अभियंता. त्यानंतर त्यांच्या पत्नीसमवेत त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातून योग विषयात मास्टर्स पदवी प्राप्त केली. डॉ. गुप्ता यांचा एक मुलगा अमेरिकेच्या डेटराईट येथे तर दुसरा आॅस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे राहतो.
हे दाम्पत्य एकदा मुलाला भेटायला तीन महिन्यासाठी डेटराईटला गेले व तेथे त्यांनी मुलाच्या ओळखीच्या लोकांना योगाचे धडे दिले. त्यांना इतर संस्थांमधूनही बोलावणे येऊ लागले. अशाप्रकारे योगा फॉर पीस, कर्मयोगा स्टुडिओ, गे्रस योगा स्टुडिओ, एलए फिटनेस सेंटर, नेस्ट सिनियर सिटीझन सेंटर आणि दि योग असोसिएशन आॅफ गे्रटर डेटराईट अशा सहा संस्थांमध्ये त्यांनी योगाचे मार्गदर्शन केले. अमेरिकेच्या फोर्ड हेल्थ सिस्टीम या संस्थेने तब्बल तीन महिन्यांसाठी या दाम्पत्याचे मार्गदर्शन घेतले. गुप्ता दाम्पत्याचा हा दरवर्षीचा प्रयत्न. मेलबर्न, आॅस्ट्रेलियाला गेल्यावरही योगाचा प्रचार कसा करता येईल, हाच त्यांचा प्रयत्न. तेथेही मेलबर्नसह सिडनी व इतर शहरांत त्यांनी योगाचे मार्गदर्शन चालविले आहे. या ओळखीतून न्यूझिलंडच्या विविध संस्थांमध्येही त्यांनी योगाचे नि:शुल्क मार्गदर्शन केले आहे. तेथील टिमरू शहराच्या महापौरांनी या दाम्पत्याला सन्मानितही केले आहे. त्यांच्या या प्रचार कार्यासाठी भारतातही आयुष मेडिकल असोसिएशन व इतर संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले. या दोघांनी आयुष्यभर देश-विदेशात योगाचा प्रचार करण्याचा प्रण केला आहे.

अमेरिका, आॅस्ट्रेलियामध्ये अनेक लोक योगाच्या नावाने साधे आसन लोकांना शिकवितात. असे तरुण दोन-तीन महिने भारतात राहून त्यांच्या देशात लोकांची दिशाभूल करतात. ही बाब आम्हाला पटली नाही. त्यामुळे खऱ्या योगाचा परिचय विदेशी नागरिकांना करून द्यावा, असा आमचा प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी योग शिक्षकांनाही आम्ही ट्रेनिंग दिले आहे. प्रत्येकच संस्था आम्हाला पैसे देऊ करते. मात्र कुणाकडूनही आम्ही पैसे स्वीकारले नाही. ही आमच्या देशाची संस्कृती आहे व या संस्कृतीचा प्रचार करून देशाचे नाव उंचवायचे आहे.
- डॉ. भरत गुप्ता, योगतज्ज्ञ

Web Title: World Yoga Day; Across the seven seas Gupta couple teaches Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग