वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल ; नागपूर अनुभवणार ‘कार्निव्हल परेड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 09:47 AM2017-12-14T09:47:37+5:302017-12-14T09:55:26+5:30

नागपुरात १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. यावेळी भव्य आॅरेंज कार्निव्हल परेडचे आयोजन करण्यात आले आहे.

World Orange Festival; 'Carnival Parade' to be experienced by Nagpur | वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल ; नागपूर अनुभवणार ‘कार्निव्हल परेड’

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल ; नागपूर अनुभवणार ‘कार्निव्हल परेड’

Next
ठळक मुद्दे१६ रथांवर स्वार भारतीयआंतरराष्ट्रीय कलावंत सादर करणार कलाहॉट एअर बलून विशेष आकर्षण

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शहरात सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अवघे सरकार नागपुरात आहे. परंतु चर्चा मात्र नागपुरी संत्र्याची होते आहे. याला कारणही तसेच आहे. संत्र्याची जगात वेगळी ओळख आहे. येथील संत्र्याचे भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात ‘ब्रॅण्डिंग’ व्हावे व सोबतच येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. यावेळी भव्य आॅरेंज कार्निव्हल परेडचे आयोजन करण्यात आले आहे. ही आॅरेंज कार्निव्हल परेड १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते संध्याकाळी ८ या वेळेत आठ रास्ता चौक ते लॉ कॉलेज चौकापर्यंत काढण्यात येईल. या परेडमध्ये १६ देखाव्यांचे रथ सहभागी होतील. या रथांवर स्वार भारतीय आणि आंतरराष्टÑीय कलावंत आपली कला सादर करतील. या कलावंतांचा उत्साह वाढविण्यासाठी ढोलताशे आणि लेझिम पथकही यात सहभागी होणार आहेत. लहान मुलांसाठी या परेडमध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

लाईव्ह कॉन्सर्ट, सिल्व्हर स्ट्रिंग्ज, डीजे अन् बरेच काही
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात १७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ‘हम दोन हमारे वो’ हे हिंदी नाटक सादर होणार आहे. यासोबतच अनुप सोनी आणि स्मिता बन्सल या कलावंतांशी संवादही आयोजित करण्यात आला आहे. रूपमती जॉली आणि लकी केनी यांचे सुफी गायनही रंगणार आहे. १८ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ हे मराठी नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सिनिअर) आणि मिलिंद पाठक यांच्याशी रंजक संवाद होणार आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात १७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत इंडियन गॉट टॅलेंट-२०१६ चा विजेता सुलेमान सुरेल बासरीवादन करणार आहे. याशिवाय लिक्विड ड्रम अ‍ॅक्ट, कॅन कॅन इंटरनॅशनल डान्सर्स, आफ्रिकन अ‍ॅक्रोबीटस् असे विविधरंगी मनोरंजनात्मक कार्यक्रम विविध देशातील कलावंत सादर करणार आहेत. डीजे अविनाश, डीजे मुक्स्का जार, डीजे नीना-मलिका, डीजे अकील या भारतातील नामवंत डीजेंच्या सादरीकरणाचा आनंदही या महोत्सवात लुटता येणार आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचे गायन होईल. १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात सोनाली कुलकर्णी (ज्युनिअर) ही अभिनेत्री दिलखेचक नृत्य सादर करणार आहे. यासोबतच ‘सिल्व्हर स्ट्रिंग’ हा वेगवेगळ्या कलावंतांचा बॅन्ड सादर होणार आहे. १८ डिसेंबरची संध्याकाळ प्रसिद्ध गायक बेनी दयाल यांच्या सुरमयी आवाजात रंगणार आहे. हे तीनही कार्यक्रम रात्री १०.३० पर्यंत चालणार आहेत.

रंजक स्पर्धा आणि आकर्षक पुरस्कार
या महोत्सवादरम्यान विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार लॅण्डस्केप स्पर्धा होणार आहे. चित्रकलेतले बारकावे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कला कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले आहे. संपूर्ण तीन दिवस इन्स्टॉलेशनही होणार आहे. सोबतच या महोत्सवाचे वेगवेगळे मूडस् टिपण्यासाठी छायाचित्र स्पर्धा होणार आहे. हौशी व व्यावसायिक अशा दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रथम विजेत्याला ५१ हजारांचा रोख पुरस्कार दिला जाणार आहे. या महोत्सावादरम्यान शहरातील दुकानदारांसाठीही एक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत या दुकानदारांना आपली दुकाने संत्रा ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून सजवायची आहेत. या स्पर्धेतील विजेत्यालाही ५१ हजारांचा रोख पुरस्कार दिला जाणार आहे.

मॅस्कॉट वाटणार संत्रे आणि ज्यूस
या भव्य आॅरेंज कार्निव्हल परेडमध्ये मॅस्कॉट (गुडीज्) विशेषत्वाने सहभागी होत आहेत. मॅस्कॉट (गुडीज्) आठ रास्ता चौक ते लॉ कॉलेज चौकापर्यंतच्या आपल्या प्रवासात शहरवासीयांना संत्रे आणि ज्यूस वाटणार आहेत.

‘मोबाईल स्टेज’वेधणार लक्ष
याशिवाय शहरातीत महत्त्वाच्या ठिकाणी ‘मोबाईल स्टेज’च्या माध्यमातून कलाकार आपली कला सादर करतील. त्यामुळे शहराच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागपूरकरांना या महोत्सवाचा आनंद लुटला येर्ईल. महोत्सवादरम्यान जे.जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई व नागपूरचे कलाकार मिळून नागपुरात विविध ठिकाणी संत्राविषयक प्रतिकृती उभारतील. संत्र्यापासून तयार केलेला ताजमहाल, संत्र्यापासून साकारलेले आयफेल टॉवर आणि हत्तीची कलाकृती लक्षवेधी ठरतील. यासोबतच बजाज इलेक्ट्रिक लिमिटेडने विशेष एलएडी इन्टॉलेशन तयार केले आहे.

मास्टर शेफ सारा टोड, विकी रतनानी येणार
टी.व्ही. स्टार व प्रसिद्ध आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ साराह टोड १७ डिसेंबर रोजी सेंटर पॉर्इंट व तिरपुडे महाविद्यालय येथे हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे. या संवादात ती पाककलेतील तिचे अनुभव व जगभरातील खाद्यपदार्थांबाबत चर्चा करणार आहे. यासोबतच १८ डिसेंबर रोजी तिरपुडे महाविद्यालय येथे सेलिब्रिटी शेफ विक्की रत्नांनी विद्यार्थ्यांशी आपला अनुभव शेअर करणार असून संत्र्यापासून नावीन्यपूर्ण रेसीपी बनवायला शिकवणार आहे.

उदघाटनासाठी मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांची मांदियाळी
सुरेश भट सभागृहात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे उद्घाटन १६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राज्याचे ऊर्जा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल व ऊर्जा तसेच पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या महोत्सवादरम्यान घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना १७ डिसेंबर रोजी हॉट एअर बलून (टेथर्ड बलून)ची सफर घडविली जाणार आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात हॉट एअर बलूनचा हा थरार अनुभवता येणार आहे.

Web Title: World Orange Festival; 'Carnival Parade' to be experienced by Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर