स्त्रित्वानेच माझे नुकसान केले : उषा खन्ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 10:18 PM2018-03-06T22:18:40+5:302018-03-06T22:19:02+5:30

५५ वर्षांच्या सांगितिक प्रवासात हे स्टारडम मला टिकवता आले नाही याचे एकमेव कारण मी स्त्री असणे हेच आहे, अशा शब्दात प्रसिद्ध संगीतकार उषा खन्ना यांनी आयुष्याच्या या वळणावर हृदयाच्या हळव्या कोपऱ्यातील दुखरी गोष्ट सांगितली.

Womanhood has hurt me: Usha Khanna | स्त्रित्वानेच माझे नुकसान केले : उषा खन्ना

स्त्रित्वानेच माझे नुकसान केले : उषा खन्ना

Next
ठळक मुद्देलोकमत भेटीत सांगितली हृदयाच्या हळव्या कोपऱ्यातील दुखरी गोष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जद्दनबाई आणि सरस्वती देवीच्या परंपरेतील मी पुढची कडी असले तरी माझा काळ आणि संगीत दोन्ही वेगळे होते. नौशादजी, शंकर जयकिशन, मदन मोहन या संगीतकारांचा सुवर्णकाळ ऐनभरात असताना मी संगीतबद्ध केलेला ‘दिल दे के देखो’ आला आणि मी रातोरात स्टार झाले. पण, ५५ वर्षांच्या सांगितिक प्रवासात हे स्टारडम मला टिकवता आले नाही याचे एकमेव कारण मी स्त्री असणे हेच आहे, अशा शब्दात प्रसिद्ध संगीतकार उषा खन्ना यांनी आयुष्याच्या या वळणावर हृदयाच्या हळव्या कोपऱ्यातील दुखरी गोष्ट सांगितली. ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ या कार्यक्रमासाठी नागपूरला आल्या असता त्यांनी लोकमतला भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्या पुढे म्हणाल्या, संगीत माझ्या रक्तातच होते. वडिलांचा समृद्ध संगीतीय वारसाही लाभला होता. म्हणून मी पुरुषी साम्राज्य असलेल्या या क्षेत्रात येण्याचे धाडस केले. प्रारंभी चांगले यशही मिळाले. परंतु पुढे निर्माता-दिग्दर्शक मला काम द्यायला घाबरायला लागले. कारण, स्त्री म्हणून माझ्यावर खूप मर्यादा होत्या आणि त्याकाळी या मर्यादा पाळून पुढे जाणे शक्य नव्हते. परिणामी बॉक्स आॅफिसच्या दृष्टीने माझे चित्रपट ‘बी ग्रेड’च राहिले. पण, मी मात्र नेहमीच माझ्यातील ‘बेस्ट’ देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच छोडो कल की बाते.... शायद मेरी शादी का खयाल...मधूबन खुशबू देता हैं...चाँद को क्या मालूम...या सारखी अजरामर गीते मी चित्रपटसृष्टीला देऊ शकले, याकडेही उषा खन्ना यांनी लक्ष वेधले.
अतिरेकी संगीतात कवित्व हरवले
आजचे कुठलेही गाणे ऐका. त्यात कान फाडणारे संगीत असते. परंतु थेट हृदयाला जाऊन भिडतील असे शब्द कुठेच दिसत नाहीत. म्हणूनच अशी गाणी दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहत नाहीत. आता तर रियॅलिटी शोे ही गायक घडविणारी फॅक्टरी झाली आहे. ज्याचा आवाज नाही, रियाजची तयारी नाही तोही गायक बनतोय. बादशाह, हनिसिंग गातात की किंचाळतात कळत नाही, इतकी चित्रपट संगीताची अवस्था वाईट झाली आहे.
आता कुणी ओळखत नाही
माझे केवळ असणेही एका काळात मैफिलीच्या ‘रौनक’चा विषय होता. आता कोण उषा खन्ना असा प्रश्न लोकांना पडतो. मी अजूनही काम करतेय, संगीत देतेय पण ओळख मात्र हरवली आहे. पण, मला त्याची खंत नाही. पंकज उधास, सोनू निगम, शब्बीर कुमार, विनोद राठोड या नवोदित गायकांना मी मंच उपलब्ध करून दिला. आज त्यांना गाताना बघून जे समाधान लाभते ते शब्दातीत आहे.
‘जिंदगी प्यार का गीत हैं’
उषा खन्ना यांचे संगीतबद्ध केलेले गीत व त्यांच्याशी मुक्त संवाद असे स्वरूप असलेला ‘जिंदगी प्यार का गीत हैं’ हा कार्यक्रम बुधवार ७ मार्च रोजी सायंकाळी ६.४५ वाजता पंडित वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंटचे संयुक्त आयोजन असलेल्या या कार्यक्रमाच्या नि:शुल्क पासेस संपल्या असून कार्यक्रमस्थळी मात्र दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत तिकीट विक्री सुरू राहणार आहे.

Web Title: Womanhood has hurt me: Usha Khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.