नागपुरात जादूटोण्याच्या नावावर महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:47 AM2019-07-11T11:47:24+5:302019-07-11T11:47:45+5:30

जादूटोण्याच्या नावाखाली प्रतापनगर ठाण्यांतर्गत दोन महिलांचे दागिने लंपास केल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे.

Woman cheated in the name of magic in Nagpur | नागपुरात जादूटोण्याच्या नावावर महिलेची फसवणूक

नागपुरात जादूटोण्याच्या नावावर महिलेची फसवणूक

Next
ठळक मुद्देप्रतापनगर ठाण्यांतर्गत दोन महिलांचे दागिने लंपास


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जादूटोण्याच्या नावाखाली प्रतापनगर ठाण्यांतर्गत दोन महिलांचे दागिने लंपास केल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. दीड तासात अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. एका प्रकरणात प्रतापनगर पोलिसांना एका संदिग्ध महिलेची माहिती मिळाली आहे.
दोन्ही घटना ८ जुलैच्या आहेत. कॉसमॉस सोसायटी निवासी विजया विनोद नामजोशी दुपारी १.३० वाजता घरीच होत्या. त्यावेळी ५५ ते ६० वर्षीय महिला त्यांच्या घरी आली. तिने विजयाला शीतला मातेची पूजा आणि हातात झाडू देऊन तिचीही पूजा करण्यास सांगितले. महिलेने सांगितल्यानुसार विजयाने झाडूला हळद-कुंकू लावले. महिलेने विजयाला गोष्टीत गुंतविले आणि हातातील अंगठी काढण्यास सांगितले. अंगठी कागदाच्या पुडीत ठेवल्याचे नाटक करून पुडीची पूजा करण्यास सांगितले. पुडी विजयाच्या हातात देऊन डबल अंगठी होण्याची बतावणी करून फरार झाली. ती गेल्यानंतर विजयाला फसल्याचे ध्यानात आले.
दुसरी घटना दुपारी ३ वाजता त्रिमूर्तीनगर निवासी रोशनी प्रवीण शेंडे यांच्या घरी घडली. रोशनी आणि त्यांची मुलगी घरी होती. त्याचवेळी एक महिला वर्गणी मागण्यासाठी घरी आली. तिने रोशनीला पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर तिने जुने कपडे मागितले आणि चहा देण्यास साांगितले. रोशनीला गोष्टीत गुंतवून महिलेने दिवाणाखाली ठेवलेले २० हजार रुपये रोख आणि १० हजार रुपये लंपास केले. महिला गेल्यानंतर रोशनीला चोरी झाल्याचे कळाले. या घटनांमुळे प्रतापनगर ठाण्यांतर्गत महिलांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये संदिग्ध महिलेचा फोटो मिळाला आहे. या आधारावर महिलेचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Woman cheated in the name of magic in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.