प्रदुषणमुक्त शहरांसाठी 'सर्कुलर इकॉनॉमी पार्क'ची निर्मिती करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By कमलेश वानखेडे | Published: November 27, 2023 06:14 PM2023-11-27T18:14:15+5:302023-11-27T18:15:46+5:30

महापालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन

Will create 'Circular Economy Park' for pollution free cities - Dy CM Devendra Fadnavis | प्रदुषणमुक्त शहरांसाठी 'सर्कुलर इकॉनॉमी पार्क'ची निर्मिती करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रदुषणमुक्त शहरांसाठी 'सर्कुलर इकॉनॉमी पार्क'ची निर्मिती करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्कुलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महापालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्कुलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी नागपूर महापालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन भांडेवाडी येथे करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला आ. कृष्णा खोपडे, आ. टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, केदार वझे, मृणाल ठाकूर आदी उपस्थित होते.

नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थापनांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महापालिकेने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी आणि नागपूर महापालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.

अत्याधुनिक डच तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील अडचणी शासन स्तरावरून दूर करीत आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. गेल्या दहा वर्षात नागपूरचा वेगाने विकास झाला आहे. मात्र, घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत व अन्य स्वच्छतेशी संबंधित अभियानात नागपूरची आता क्रमवारी सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास फडणवीस यावेळी व्यक्त केला.

मनपाला रॉयल्टीही मिळणार- गडकरी

- नागपुरासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रॉडक्ट तयार होणार असून, मनपाला रॉयल्टीही प्राप्त होणार आहेत. प्रदुषणमुक्तीकडे नागपूरचे हे पाऊल असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Web Title: Will create 'Circular Economy Park' for pollution free cities - Dy CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.