जप्त आंबे गेले कुठे ?

By admin | Published: May 21, 2017 02:15 AM2017-05-21T02:15:43+5:302017-05-21T02:15:43+5:30

कार्बाईडने अवैधपणे पिकविलेले आंबे जप्त करून भांडेवाडीत नष्ट केल्याचे आणि सुगंधित तंबाखू व निकृष्ट सुपारी विक्रेत्यांवर कारवाई

Where did the confiscated mumps go? | जप्त आंबे गेले कुठे ?

जप्त आंबे गेले कुठे ?

Next

अन्न व औषध विभागाचा देखावा : फौजदारी कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कार्बाईडने अवैधपणे पिकविलेले आंबे जप्त करून भांडेवाडीत नष्ट केल्याचे आणि सुगंधित तंबाखू व निकृष्ट सुपारी विक्रेत्यांवर कारवाई करून जप्त केलेला माल जाळल्याचे अधिकारी सांगतात. पण पुराव्याअभावी त्यांच्या वक्तव्यात किती तथ्य आहे, हे पडताळून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. यंदा आंब्याच्या हंगामात अन्न व औषधी विभागाने केवळ एकदाच कळमना मार्केटमध्ये कार्बाईडने आंबे पिकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली आणि सुमारे १.६१ लाख रुपयांचा माल जप्त करून भांडेवाली डम्पिंग यार्डमध्ये नष्ट केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण जप्त केलेला माल अधिकाऱ्यांनी कुणाच्या उपस्थितीत नष्ट केला, याची नावे गुलदस्त्यात आहे. अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांना विचारणा केली असता काही सामाजिक संघटनांचे लोक यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण यापूर्वीही अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानंतरही जप्त माल नष्ट केल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग कधीही दाखविले नाही, असा आरोप ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केला.
केकरे यांनी सांगितले, चार दिवसांपूर्वी जप्त केलेली निष्कृष्ट दर्जाची सुपारी आरोपीच्या प्रतिष्ठानमध्ये सील करून ठेवली असून नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. पुढे या सुपारीचे काय, हा गंभीर प्रश्न आहे.
याशिवाय काही दिवसांपूर्वी विभागाने सुमारे आठ लाख रुपयांचा गुटखा व तंबाखू नष्ट केल्याची माहिती आहे. विभागाचे माल नष्ट केल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असावे. तो व्हिडीओ अधिकाऱ्यांनी दाखवावा, असे संघटनांचे मत आहे.












जप्त आंबे गेले कुठे ?





तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी
नागपुरात लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे. गुटखा माफियांसोबत अन्न व प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांचे असलेले लागेबांधे यामुळे शहरासह जिल्ह्यात अधिक प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत आहे. कारवाईचा केवळ देखावा केला जात आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांसह गुटखा शौकिनांचेही फावत आहे. तसेच खाद्यपदार्र्थांचे नमुने घेण्याच्या नावावर कारवाई केली जाते. सण आणि उत्सवाच्या काळात दरवर्षीच अन्न व प्रशासन विभाग कारवाईचा देखावा करत आपला हप्ता वाढवून घेतो, असा आरोप होत आहे. अपुरे कर्मचारी असल्याची ओरड न करता सहआयुक्तांनी कारवाई करण्याचा सपाटा लावावा, अशी ग्राहक संघटनांची मागणी आहे.
दाल मिल, आॅईल मिल, बेसन मिल यांचे नमुने घेण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते. त्यामुळे याचा थेट परिणाम शरीरावर होत आहे. मात्र, यांचे काहीही सोयरसुतक अन्न व औषध प्रशासन विभागाला नाही, असा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.
सर्वच पानठेल्यांवर खर्रा उपलब्ध
एका नामांकित कंपनीच्या गुटख्याची पुडी काळ्या बाजारात सुमारे ५० रुपयांत तसेच नागपुरातील सर्वच पानठेल्यांवर खर्रा सहजरीत्या उपलब्ध आहे. वर्षातून एकदाच कारवाई होत असल्यामुळे अधिकाऱ्यांचा धाक राहिला नाही. गुटख्याच्या विक्रीला अधिकाऱ्यांचे पूर्ण पाठबळ असल्यामुळे सर्रास विक्री होत असल्याचा आरोप होत आहे.


अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करून जप्त केलेला माल व्यापाऱ्यांना परत करतात. जप्त आणि नष्ट केल्याचे सोंग करतात. लोकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण नेहमीचेच आहे. हे कारण चुकीचे आहे. कार्बाईडने पिकविलेल्या आंब्याची बाजारात विक्री होते. पण कारवाई शून्य आहे. कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये धाक निर्माण होईल.
- गजानन पांडे, विदर्भ प्रांत अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत.

 

Web Title: Where did the confiscated mumps go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.