When is the Nagpur Airport's privatization done? | नागपूर विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त केव्हा?'

- मोरेश्वर मानापुरे
नागपूर : राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे (एमएडीसी) संचालन करणाºया डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची खासगीकरणी प्रक्रिया वर्षापासून सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. पण मुहूर्ताची तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही.
मिहान प्रकल्पात विमानतळ विकासाचा समावेश आहे. आघाडी सरकारच्या काळात पाच वर्षे निविदा निघाली नाही. २०१६च्या प्रारंभी निविदा निघाली. स्पर्धेत १२ कंपन्या होत्या. त्यातील टाटा रिअ‍ॅलिटी, जीएमआर इन्फ्रा, जीव्हीके, पीएनसी इन्फ्राटेक व एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या पात्र ठरल्या. पण त्यानंतरच्या प्रक्रियेची गती संथ आहे.
निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या पाच कंपन्यांना देण्यात येणारा प्रारूप सवलत करारनामा (ड्राफ्ट कन्सेशन अ‍ॅग्रिमेंट) आणि महसूल प्रस्ताव (आरएफपी) एमएडीसीने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला असून पुढील कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. खासगीकरणात ७४ टक्के समभाग कंपनीकडे जातील आणि राज्य व केंद्राची भागीदारी १३-१३ टक्क्यांवर येईल.
कंत्राट मिळालेल्या कंपनीला १९८२ कोटी रुपये खर्चून नवीन विमानतळ उभे करायचे आहे. पहिल्या टप्प्यात १४२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत दोन समांतर धावपट्ट्या कार्गो आणि टर्मिनल इमारत तसेच विविध एमआरओंचा समावेश राहणार आहे. पुढील तीन टप्पे ५४० कोटी रुपयांचे असतील.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कागदपत्रे पाच कंपन्यांना देण्यात येतील. कंपन्यांना येणाºया अडचणींचे निराकरण बैठकीत करण्यात येईल. विमानतळ खासगीकरणाचा राज्य शासनाचा पहिलाच प्रकल्प आहे. प्रक्रियेत कुठल्याही अडचणी येऊ नयेत, याची काळजी शासन घेत आहे.
- सुरेश काकाणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एमएडीसी