जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार ?

By कमलेश वानखेडे | Published: May 28, 2023 08:00 AM2023-05-28T08:00:00+5:302023-05-28T08:00:21+5:30

Nagpur News अकोला लोकसभेत गेल्या चार टर्मपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे हे विजयी झेंडा रोवत आहेत. आघाडीत ही जागा काँग्रेस लढत आली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती जाहीर केली.

What is not owned by Uddhav Thackeray, how will he give it to Ambedkar? | जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार ?

जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार ?

googlenewsNext

 

 

नागपूर : अकोला लोकसभेत गेल्या चार टर्मपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे हे विजयी झेंडा रोवत आहेत. आघाडीत ही जागा काँग्रेस लढत आली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती जाहीर केली. पण ॲड. आंबेडकर अद्याप महाविकास आघाडीत दाखल झालेले नाहीत. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी ही जागा आंबेडकरांसाठी सोडण्यास इच्छुक नाही. एकूणच परिस्थिती पाहता जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार, असा पेच निर्माण झाला आहे.

अकोला मतदारसंघात नेहमी भाजप, काँग्रेस व भारिप बमसं (सध्याची वंचित बहुजन आघाडी) अशीच तिहेरी लढत होते. कधी काँग्रेस तर कधी वंचित बहुजन आघाडी आलटून पालटून दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस लढत आली. गेल्या चार दशकांपासून येथे काँग्रेसचा होत असलेला पराभव याचे भांडवल करीत शिवसेना या जागेवर दावा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ॲड. आंबेडकर यांच्याशी मैत्रीचा हात मिळविला आहे. पण सत्तासंघर्षातील निकालानंतर अकोल्यातील पत्रकार परिषदेत त्यांना आघाडीतील प्रवेशासंदर्भात छेडले असता, मी शिवसेना ठाकरे गटाचा मित्र आहे, महाविकास आघाडीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आंबेडकर हे महाविकास आघाडीकडे स्वत: अकोल्याची जागा मागणे टाळत आहेत. पण त्यांच्यावतीने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांत प्राथमिक चर्चाही आटोपली आहे. ॲड. आंबेडकरांना महाविकास आघाडीत थेट जागा मिळाली नाही तर ती आपल्या कोट्यात घेऊन आंबेडकरांना लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे. हा पेच सोडविण्यात यश आले व काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची व्होट बँक एकत्र आली तर भाजपला तगडी फाइट दिली जाऊ शकते.

सुरुवातीची दहा टर्म काँग्रेसकडे असलेली अकोल्याची जागा १९८९ मध्ये हिसकावण्यात भाजपचे पांडुरंग फुंडकर यांना यश आले होते. फुंडकर तीन टर्म विजयी झाल्यानंतर १९९८ व १९९९ या दोन्ही निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून ही जागा खेचली होती. यापैकी ९८ च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार यांच्या पुढाकाराने धर्मनिरपेक्ष मतांची मोट बांधली गेली होती. ॲड. आंबेडकर (रा. गवई, अमरावती), प्रा. जोगेंद्र कवाडे (चिमूर) व रामदास आठवले (मुंबई उत्तर मध्य) हे आंबेडकरी नेते खुल्या मतदारसंघातून विजयी झाले होते. आता भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचे तसेच प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्राच्या नजरा अकोल्याकडे असतील.

 

Web Title: What is not owned by Uddhav Thackeray, how will he give it to Ambedkar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.